आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ जुलै
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं पावसाळी
अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. येत्या दहा ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अट्ठेचाळीस
महत्त्वाची विधेयकं सरकार मांडणार आहे. विरोधकांनी चर्चा आणि सूचना केल्यास सरकारला
एखाद्या कामात सुधारणा करता येते, असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात
आल्यानंतर म्हटलं. संसदेच्या कामाचा जासतीत जास्त वेळ देशाच्या कामकाजासाठी वापरला
जाईल, हे सगळ्या पक्षांनी सुनिश्चित करावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
सर्वांसाठी
घरे, या केंद्र शासनाच्या ध्येयाच्या पूर्ती साठीचा एक टप्पा म्हणून, राज्यातल्या नागरिकांसाठी,
परवडणाऱ्या किमतीतल्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथे झाला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास
प्राधिकरण अर्थात म्हाडा च्या कोकण विभागातल्या सुमारे नऊ हजार तर नागपूर विभागातल्या
सुमारे दीड हजार सदनिकांसाठी ही नोंदणी आज सुरू झाली.
****
राज्यातल्या
नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या समस्ये बाबत गंभीर नसल्या बद्दल मुंबई उच्च न्यायालयानं
राज्य सरकारला फटकारलं आहे. सरकारनं याबाबत योग्य ते धोरण न आखल्यास न्यायालय याबाबत
आदेश जारी करेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. वनशक्ती या सामाजिक संस्थेनं यासंदर्भात
दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान, २०१४ साली राज्यातल्या ४९ नद्यांचं
पाणी प्रदूषित होतं आता ही संख्या ५९ वर पोचल्याची माहिती, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळा कडून मिळाल्यानंतर न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आहे.
****
मुंबईतल्या,
एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकाचं नाव बदलण्यात आलं असून, आता या स्थानकाला प्रभादेवी
स्थानक, असं म्हटलं जाणार आहे. पश्चिम रेल्वेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती
दिली आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या
मुक्ताई नगर नगरपंचायत निवडणुकीसाठी 65 पूर्णांक 47 टक्के मतदान झालं असून, नगराध्यक्ष
पदासाठी भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होत
आहे. येत्या 20 तारखेला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment