Regional Marathi Tex20t
Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२३ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय प्रसारण दिवस आज पाळण्यात येत आहे. ९१ वर्षांपूर्वी, १९२७ साली याच दिवशी मुंबईच्या रेडिओ क्लबमधून पहिलं
प्रसारण झालं होत. आकाशवाणीची ही सेवा पुढे आणखी विस्तारत गेली, सध्या आकाशवाणीवरून २३ भाषा आणि १४६ बोली
भाषांमधून कार्यक्रमांचं प्रसारण केलं
जातं.
****
दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास पूर्णपणे
बंदी घालू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या मैदानावर आंदोलनाला मंजुरी
देण्यासाठी सरकारनं मार्गदर्शक तत्वं तयार करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
या मैदानावर आंदोलन करण्यास, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं घातलेल्या बंदी विरोधात,
कामगार शेतकरी शक्ती संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं,
नागरिकांना आंदोलन करण्याचा आणि शांततेत राहण्याच्या अधिकाराचं संतुलन राखलं गेलं पाहिजे,
असं नमूद केलं.
****
जमावाकडून
होणाऱ्या हत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी, केंद्र सरकार भारतीय दंड संहितेत
सुधारणा करण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे. यासाठी राज्य
सरकार कडून कारवाई बाबत एक आदर्श कायदा आणण्याचा सरकार विचार करत असल्याचं,
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं. हा कायदा, जमावाद्वारे
हत्यांसाठीच्या गुन्ह्या पर्यंतच मर्यादित न राहता, समाज माध्यमांना नियंत्रित
करणाऱ्या तरतुदीही या कायद्याच्या कक्षेत येतील, असं
या अधिकाऱ्यानं सांगितलं.
****
१९९५च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजने
संदर्भात अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये या संदर्भात प्रकरणं प्रलंबित असून,
ती निकाली निघताच, वेतन वाढीचा निर्णय घेण्यात येईल, असं श्रम आणि रोजगार राज्यमंत्री
संतोष गंगवार यांनी सांगितलं. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात या बाबत प्रश्न विचारला होता. नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांनीही, या योजने
अंतर्गत मिळणारं निवृत्ती वेतन सर्वसामान्य कामगाराच्या वेतना पेक्षाही कमी असून, ते
लवकरात लवकर वाढवण्याची मागणी केली.
भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी
भविष्य निर्वाह निधीची माहिती संदिग्ध असल्याचं म्हटलं होतं, या कडेही सातव यांनी प्रश्नकाळात
लक्ष वेधलं. यावर उत्तर देताना गंगवार यांनी, तांत्रिक त्रुटींमुळे माहिती अद्ययावत
करण्यात विलंब होत असल्याचं सांगत, सरकार सर्व शंकांचं निरसन करण्यास तयार असल्याचं
सांगितलं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच तेलगु देसम पक्षाच्या
सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली.
सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्य काळ पुकारल्या नंतरही सदस्यांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं,
कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं.
तेलगु देसम पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेरही
फलक झळकावत आंदोलन केलं. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं या खासदारांनी
सांगितलं.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६२ व्या जयंती
निमित्त आज त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
टिळकांना आदरांजली वाहिली आहे. टिळकांनी भारतीयांच्या मनात देशभक्ती निर्माण केली,
सर्व समाजातल्या लोकांना एकत्र आणलं, तसंच शिक्षणावर भर दिला, असं पंतप्रधानांनी ट्विटर
संदेशात म्हटलं आहे.
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनाही आज जयंती निमित्त
पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे. आझाद यांच्या शौर्यानं देशातल्या सर्व पिढ्यांना
प्रेरणा मिळाली, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
बीड
इथं जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार
राजेंद्र महाजन यांनी टिळकांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं.
****
सुकन्या
समृध्दी योजने अंतर्गत खात्यातल्या किमान रकमेची मर्यादा आता एक हजार रुपयांऐवजी
अडीचशे रुपये करण्यात आली आहे. योजनेची
किमान मर्यादा घटवल्यामुळे जास्तीत
जास्त नागरीक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजने अंतर्गत खातं उघडण्यासाठी आता किमान शिल्लक एक हजार रुपयांऐवजी अडीचशे रुपये असेल.
दहा वर्षांच्या आत वय असणाऱ्या मुलींचे जन्मदाते किंवा पालकांना मुलींच्या नावे या योजने अंतर्गत खातं उघडता येतं.
****
बंगळुरू
इथं काल न्यूझीलंड बरोबरचा झालेला तिसरा हॉकी सामना चार शून्य असा जिंकून भारतानं
मालिकाही जिंकली आहे. रूपींदर पाल सिंग, सुरेंद्र कुमार, मनदीप
सिंग, आणि आकाशदिप सिंग यांनी गोल करत भारताला विजय मिळवून दिला. येत्या १८ ऑगस्ट पासून इंडोनेशियात जकार्ता आणि पलेम्बन
इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीनं संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचं
प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ जुलैला
आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ४६वा भाग असेल.
*****
***
No comments:
Post a Comment