Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१९ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
संपूर्ण देशात विद्युतिकरणासह वीज
वीतरण प्रणालीत सुधारणा करण्यावरही सरकार भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेतल्या
लाभार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. देशाला स्वातंत्र्य
मिळून ७० वर्ष झाल्या नंतरही अजून १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही, ही बाब दुर्भाग्यपूर्ण
असल्याचं ते म्हणाले.
****
माहिती अधिकाराच्या कायद्यात बदल केल्यास, तो निरुपयोगी
ठरेल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या प्रस्तावित बदलांना प्रत्येक
भारतीय विरोध करेल, असं गांधी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. माहितीचा अधिकार कायदा
२००५ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकारनं काल सांगितलं होतं.
****
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा - बिजापूर सीमेवर तिमेनर
जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत सात नक्षलवादी
ठार झाले. यात तीन महिलांचा समावेश आहे. घटना स्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा
जप्त करण्यात आला आहे.
****
जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात रक्ताच्या नात्यात
वैधता प्रमाणपत्र असेल, तर संबंधित अर्जदाराला वैधता प्रमाणपत्र देण्यास विलंब करू
नये, अशी मागणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. आज विधान सभेत लक्षवेधी सूचना
मांडताना खडसे यांनी, शिष्यवृत्ती संदर्भात, जात वैधता पडताळणी समिती सदस्याने केलेल्या
३२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईची मागणी केली.
सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची
चौकशी करण्याचं तसंच संबंधित सदस्याची तत्काळ बदली करण्याचं आश्वासन सरकार पक्षाकडून
देण्यात आलं. त्यापूर्वी ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी विधान सभेत चर्चा करण्यात
आली.
****
मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेसाठी विरोधी पक्षांकडून
आज विधान सभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला. सदनाची सर्व चर्चा थांबवून या प्रकरणी चर्चा
करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, यांच्यासह अनेक सदस्यांनी
केली.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना, या
पूर्वीच्या सरकारनं वेळकाढूपणा केल्यानं, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नसल्याचं,
नमूद केलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची स्पष्ट भूमिका
असल्याचं, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आरक्षणाचा निर्णय होई पर्यंत
शिक्षण, उद्योगासह प्रत्येक क्षेत्रात सरकार मराठा समाजाला मदत करत असल्याचं, पाटील
यांनी सांगितलं.
****
दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणी साठी स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्या वतीनं सुरु असलेल्या आंदोलनात आज हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या
डोंगरकडा इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद सोलापूर मार्गावर जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री
इथं आणि जालना - भोकरदन मार्गावर राजूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको
आंदोलन केलं.
****
औरंगाबाद शहरातल्या कचरा प्रश्नी शिवसेनेनं आक्रमक
भूमिका घेत, आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन ट्रक कचरा टाकून, सरकारचा
निषेध केला. शहरात पाच महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडी प्रकरणी महापालिका
बरखास्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिला होता, त्याचा निषेध
करत, कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याबाबतचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
सिंगापूर
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डे, शुभंकर
डे, आणि ऋतुपर्ण दास यांनी आपापल्या गटात एकेरीच्या दुसऱ्या फेरीत
प्रवेश केला आहे. दुहेरीतही प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या
जोडीनं दुसरी फेरी गाठली आहे. मात्र पुरूष एकेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू बी साई प्रणितला
पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
****
बेल्जियम
इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील कनिष्ठ हॉकी स्पर्धेत महिलांच्या चौथ्या रॉबीन
फेरीत भारत आणि कॅनडा यांच्यातला सामना काल अनिर्णित राहिला.
भारतीय पुरुष आणि महिला संघांचा रॉबीन फेरीतला अंतिम सामना उद्या नेदरलँड्स विरुद्ध
होणार आहे.
****
राज्यात
२३ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता
नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन
खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थिती
नुसार शेतीचं नियोजन करावं,
असं आवाहन
कृषी विभागाकडून करण्यात आलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment