आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ जुलै
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. १९ वर्षांपूर्वी
याच दिवशी भारतीय सैन्यानं, पाकिस्तान कडून होणारी घुसखोरी परतवून लावत विजय मिळवला
होता. साठ दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात पाकिस्ताननं
आक्रमण केलेल्या सगळ्या लष्करी चौक्या ताब्यात घेण्यात भारतीय जवान यशस्वी झाले. या
युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज विविध ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं
आयोजन केलं जात आहे. कारगिल विजय
दिवसाच्या तीन दिवसांच्या सोहळ्याला मंगळवारी जम्मू कश्मीरमधल्या द्रास इथल्या
युद्धस्मारकावर प्रारंभ झाला. आज या सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कारगिल युद्धात वीरमरण
आलेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. प्रत्येक भारतीय सशस्त्र सेनेच्या संघर्ष
आणि वीरतेचा सन्मान करत असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन
येत्या एक आणि दोन ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. शेकापनं काल अलिबाग इथं एक पत्रक
जारी करून ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
हस्ते या अधिवेशनाचं उद्दघाटन होणार आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील या अधिवेशनात
मार्गदर्शन करणार आहेत.
****
मराठा आरक्षणाच्या मागणी साठी जालना जिल्ह्यात आज
चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जाफ्राबाद इथं रस्त्यावर रबरी चाकं पेटवून दिल्यानं,
वाहतुक विस्कळीत झाली आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आजपासून बेमुदत
धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
****
मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठित क्रांतीवीर
लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारसींच्या प्रभावी अंमलबजवणीचे निर्देश
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत. काल याबाबत मुंबईत मंत्रालयात
बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
****
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून पैठणच्या
जायकवाडी धरणात होणारी आवक मंदावली आहे. सध्या धरणात सुमारे साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणातला पाणीसाठा ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment