Saturday, 28 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २८  जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



Ø मराठा आरक्षण प्रश्नी आज विधानभवनात सर्वपक्षीय बैठक

Ø राज्यात अनेक भागात आंदोलन सुरुच; हिंगोलीत आंदोलनाला हिंसक वळण

Ø मालवाहतूकदारांचा संप मागे

Ø साखर कारखान्यांना उसापासून थेट इथेनॉल बनवण्याची परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय 

आणि

Ø राज्यात सलग तिसऱ्या वर्षी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण; नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक वृक्षारोपण

****



 मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधान भवनात सर्व पक्षीय बैठक घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या परवा झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करेल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, म्हणूनच याबाबत अध्यादेश काढला होता. मात्र न्यायालयानं सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयापुढे ठेवून त्यावर लवकर निर्णय करण्याची विनंती केली जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

****



 आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणावर तत्काळ विचार करण्यास तयार असल्याचं माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि मराठा नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगून राणे यांनी, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सक्षम असल्याचं नमूद केलं. मात्र मराठा संघटनांनी आंदोलन मागे घेऊन चर्चा करावी, असं आवाहन राणे यांनी केलं.  

****



 दरम्यान, राज्यात कालही अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं.



 हिंगोली जिल्ह्यात आंदोलकांनी नांदेड -हिंगोली रस्त्यावर दाते फाटा इथं ट्रक जाळले, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय तोडफोड करुन पेटवून दिलं, जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार रामराव वडकुते चर्चेसाठी गेले असता, त्यांनाही आंदोलकांनी विरोध केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 नांदेड जिल्ह्यात आमदुरा इथं आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी झाले. जालना जिल्ह्यात जाफराबाद इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं काल सामुहिक मुंडन करुन सरकारचा निषेध करण्यात आला.



 सोलापूर शहरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर निदर्शनं करत, राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

 धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन काल सलग सातव्या दिवशीही सुरु होतं

 नाशिकमध्ये महिलांनी काल गोदावरी नदी पात्रात उतरुन आंदोलन केलं.

****



 दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी विधानसभा अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाकडे आपला राजीनामा पाठवला आहे. झनक यांच्यासह जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ५०हून अधिक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 राज्य शासनानं नेमलेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळानं काल राज्यमागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आणि सदस्य सुवर्णा रावल यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात आयोगाचा अहवाल तातडीनं राज्य शासनाला द्यावा, अशी विनंती या शिष्टमंडळानं केली आहे.

****



 आर्थिक निकषांवर आरक्षण ही केंद्र सरकारनं मराठा आरक्षणावर काढलेली पळवाट असल्याची टीका भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नंदुरबार इथं बहुजन आघाडीच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. सध्याच्या राज्यघटनेत आर्थिक निकषांवर आरक्षणाचा मुद्दा वैध ठरु शकत नाही, त्यासाठी राज्यघटना बदलावी लागेल असं आंबेडकर यावेळी म्हणाले.

****



 गेल्या वीस जुलै पासून सुरू असलेला मालवाहतूक दारांचा संप काल मागे घेण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याशी काल झालेल्या चर्चेनंतर मालवाहतूक दारांच्या संघटनेनं संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. वाहतुकदारांच्या ई वे बिल आणि विम्यासह इतर समस्या सोडवण्यासाठी उचस्तरीय समिती स्थापन करण्याचं आश्वासन सरकारनं या चर्चेवेळी दिलं. नव्वद लाख मालवाहतूकदार या संपात सहभागी झाले होते.

****



 साखर कारखान्यांना उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी १९६६च्या ऊस नियंत्रण निर्देशात सुधारणा करण्यात आली आहे. आता पर्यंत कारखान्यांना साखर उत्पादित झाल्यावर शिल्लक मळी पासून इथेनॉल उत्पादन करता येत होत, आता साखरेसोबतच प्रमुख उत्पादन म्हणून इथेनॉल निर्मिती करता येईल. सरकारनं पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यास तेल कंपन्यांना परवानगी दिली आहे, मात्र इथेनॉलच्या पुरेशा उत्पादनाअभावी हे प्रमाण सध्या सुमारे चार टक्के एवढंच आहे.



 साखरेचा अतिरिक्त साठा निर्माण करणं आणि किमान विक्री मूल्य निश्चित करणं यासारख्या केंद्र सरकारच्या उपाय योजनांमुळे साखरेच्या किंमतीत सुधारणा झाली असल्याचं इकरा या पतमानांकन संस्थेनं म्हटलं आहे. साखरेचे दर २६ हजार ५०० रुपये प्रति टन वरुन ३३ हजार ५०० रुपये प्रति टन इतके वाढल्याचं, या संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

****



 विरोधी पक्षांच्या नेत्यांचे राजीनामे मागण्यापेक्षा, शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढावा असं आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास दबाव येऊन सरकार मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढेल असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

****



 मराठा आरक्षणाची मागणी कऱणाऱ्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सूडाची असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, ही कारवाई तत्काळ थांबवावी, तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

****



 राज्यात सलग तिसऱ्या वर्षी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण झालं असून काल झालेल्या नोंदीप्रमाणे राज्यभरात १३ कोटी ४८ हजार वृक्ष लागवड झाली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत दिली. लोकसहभागामुळे हे शक्य झालं असून वृक्ष लागवडीत सहभागी झालेल्या सर्व व्यक्ती, संस्था, व्यापारी- उद्योजक, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख, यांचे त्यांनी आभार मानले. राज्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सर्वाधिक वृक्ष ८२ लाख २६ हजार ९६ झाडं लावण्यात आली, नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून चंद्रपूर तिसऱ्या, यवतमाळ चौथ्या आणि औरंगाबाद जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.

****



 नांदेड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी फक्त २० टक्के उद्दीष्ट साध्य झाल्यानं कर्ज वाटपासाठी धडक मोहीम राबवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात बँकांनी तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निर्देशही त्यांनी दिले आहेत.

****



 लातूर इथले उद्योजक युवराज पन्हाळे यांच्या खून प्रकरणी दोन जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातल्या पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. युवराज पन्हाळे यांचा खाजगी बससेवेच्या व्यवसायावरून ४ डिसेंबर २०१२ रोजी खून झाला होता. या प्रकरणी १८ साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर युवराज यांचे पुतणे संतोष पन्हाळे आणि संतोषचे मामा मधुकर बस्तापुरे हे दोषी आढळल्यानं, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

****



 धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात शिंगावे आणि असली ग्रामपंचायतीत सन २०१५-१६ मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात १ कोटी, ३८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं  उघडकीला  आलं  आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन सरपंच, गटविकास अधिकाऱ्यांसह ९ जणांविरुध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या रोहिलागड इथल्या सरपंच आणि इतर सदस्यांविरोधात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे.

****



 गुरुपौर्णिमेचा उत्सव काल देशभर भक्तिभावानं साजरा झाला. शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात तसंच शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. औरंगाबाद इथंही गुरूपौर्णिमेनिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अंबाजोगाई इथंही वेदव्यास पूजन तसंच संत भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

****



 या शतकातलं सर्वाधिक कालावधीचं खग्रास चंद्रग्रहण काल झालं. रात्री सव्वा अकरा वाजता सुरु झालेलं हे ग्रहण सुमारे दीड तास चाललं. संपूर्ण देशभरात हे ग्रहण पाहता आलं.

****



 शेतकऱ्यांना विविध कर्जांबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या वतीनं आज राज्यभरात कर्जमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बँकेच्या २६ शाखांमधून मेळावे आयोजित केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी प्रदीप कुतवळ यांनी दिली.

*****

***

No comments: