Friday, 27 July 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.07.2018 13.00




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७  जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****

साखरेचा अतिरिक्त साठा निर्माण करणं आणि किमान विक्री मूल्य निश्चित करणं यासारख्या केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे साखरेच्या किंमतीत सुधारणा झाली असल्याचं इकरा या पतमानांकन संस्थेनं म्हटलं आहे. साखरेचे दर २६ हजार ५०० रुपये प्रति टन वरुन ३३ हजार ५०० रुपये प्रति टन इतके वाढल्याचं, या संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. २०१८-१९ या हंगामात साखरेचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन, याबाबत सावधानतेचा इशाराही अहवालात दिला आहे. साखरेच्या उत्पादनात दरवर्षी ६० टक्के वाढ लक्षात घेऊन आणि दोन दशलक्ष टन साखरेची निर्यात करुनही ९९ पूर्णांक पाच दशांश दशलक्ष टन इतका साठा शिल्लक राहतो, असं संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह प्रमुख सव्यसाची मुजूमदार यांनी म्हटलं आहे.

****

मानव तस्करी प्रतिबंधक, संरक्षण आणि पुनर्वसन विधेयक लोकसभेत संमत झाल्याबद्दल नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे विधेयक एकमतानं मंजूर होणं हे, जनतेच्या रक्षणाप्रती राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आणि विवेकबुद्धी यांचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले. पीडित व्यक्तींचं संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन, तसंच अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तस्करी विरोधी दल स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योजक विजय मल्ल्या, आपली मालमत्ता विकून कर्जवसुली करायची परवानगी बँकांना देण्याच्या आदेशाविरुद्ध, आता याचिका दाखल करु शकणार नाही. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीकरता मल्ल्याची इंग्लंड आणि वेल्स इथली मालमत्ता विकून कर्जवसूली करण्याची परवानगी इंग्लंडच्या उच्च न्यायालयानं आठ मे रोजी दिली होती. त्याविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी मागण्यासाठी मल्ल्यानं केलेला विनंतीअर्ज इंग्लंडच्या न्यायालयानं फेटाळला आहे.

****

द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी यांना चेन्नईत कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ९४ वर्षांचे करुणानिधी यांनी आजचं द्रमुकच्या अध्यक्षपदाची पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. करुणानिधी यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षण मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड इथल्या २१ युवकांनी आज गोदावरी नदीच्या आमदुरा पुलावरून जलसमाधीचा इशारा दिला होता, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सहा युवकांना ताब्यात घेतलं आहे. आज सकाळपासून या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तसंच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या आसेगाव इथल्या एका तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल विष प्राशन केलं, त्याला उपचारासाठी नांदेड इथं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या आंदोलनातदरम्यान काल मरण पावलेल्या रोहन तोडकर याचा मृतदेह सातारा जिल्ह्यातल्या चाफळ खोनोली या त्याच्या गावी नेण्यात येत आहे. परवा कोपर खैरणे इथं आंदोलनादरम्यान तो जखमी झाला होता.

****

या शतकातलं सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज होणार आहे. रात्री सव्वा अकरा वाजता ग्रहण सुरु होणार असून, ते एक तास ३० मिनीटं चालणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यानं त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून या चंद्राला ब्लड मून असंही म्हटलं जातं.

****

अलिबाग नजिक केगाव समुद्र किनाऱ्यावर नऊ फुटी डॉल्फीन मृतावस्थेत सापडला आहे. यापूर्वी देखील अलिबाग आणि मुरूडच्या किनाऱ्यांवर देवमासे मृतावस्थेत सापडले होते. समुद्रात मोठी जहाजं आणि ट्रॉलरच्या वाढत्या संचाराचा जलचर सृष्टीवर परिणाम होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

****

चेन्नईत सुरु असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॅश स्पर्धेत उपान्त्य पूर्व फेरीत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं भारताचा दोन - एक असा पराभव करुन उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

लंडन इथं सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. आयर्लंड संघानं भारताचा शून्य - एक असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना रविवारी अमेरिका विरुद्ध होणार आहे.

****

गुरु पौर्णिमेनिमित्त आज बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या समाधी मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातूनही भाविक शेगाव इथं दर्शनासाठी येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथंही भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

//**********//




No comments: