Thursday, 19 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक   जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



Ø मराठवाडा, आणि विदर्भात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार ६५१ कोटीं रुपयांचं  विशेष पॅकेज मंजूर

Ø केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल; प्रस्तावावर उद्या चर्चा आणि मतदान

Ø दूध बंद आंदोलनात आज जनावरांसह चक्का जाम आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

आणि

Ø औरंगाबाद शहरातला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

****



 मराठवाडा, आणि विदर्भातल्या १४ दुष्काळी जिल्ह्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्रि मंडळानं १३ हजार ६५१ कोटीं रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे. जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. पुढील वर्षी मे महिन्या पर्यंत या सर्व प्रकल्पांचं काम पूर्ण होईल. या पॅकेज मध्ये राज्यातले आठ मोठे आणि मध्यम प्रकल्प तर ८३ लघु सिंचन प्रकल्प असून, मराठवाड्यातल्या १७ प्रकल्पांचा यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५, जालना ६, नांदेड २, लातूर ३ आणि बीड जिल्ह्यातल्या एका प्रकल्पाचं काम या पॅकेज अंतर्गत पूर्ण होणार आहे.

****



 येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये सरकारनं वाढ केली असून, आता हा दर दोन हजार ७५० रूपये प्रतिटन असा केला आहे.  येत्या हंगामात उसाचं उत्पादन पस्तीस दशलक्ष टन इतकं होण्याची अपेक्षा आहे.

****



 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल पासून प्रारंभ झाला. काल पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी सरकार विरुद्ध सादर केलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला. या प्रस्तावावर उद्या शुक्रवारी चर्चा होणार असून, या चर्चेसाठी अध्यक्षांनी सात तासांचा वेळ निर्धारित केला आहे, चर्चेनंतर उद्याच या प्रस्तावावर मतदानही घेण्यात येणार आहे.



 महाराष्ट्रातले शेतकरी, दूध उत्पादक, अंगणवाडी कर्मचारी, तसंच शिक्षक, सतत आंदोलनं करत असून, सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही लोकसभेत शून्य काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तर हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी राज्यात पीक कर्ज वाटपाच्या संथ गतीकडे सरकारचं लक्ष वेधलं.



 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातली कोणतीही तरतूद कमकुवत होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल राज्यसभेत प्रश्नकाळात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना दिली. हा कायदा अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीनं सरकारनं २०१५ मध्ये यात काही दुरुस्ती केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****



 मुलांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २०१७ हे दुरूस्ती विधेयक काल लोकसभेनं मंजूर केलं. यामध्ये पाचवी आणि आठवीतल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुलांना शाळेतून काढून टाकण्याचं कोणतही धोरण नसून त्यांची फेर परीक्षा घेण्यात येईल, असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

****



 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळण्यासाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाख रूपयांवरुन आठ लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल विधान परिषदेत केली. तर, पहिली प्रवेशाचं वय सहा वर्षांवरून पाच वर्षांवर आणता येणार नाही, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.

****



 राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोमवार पासून पुकारलेल्या दूध बंद आंदोलनात आज राज्यभरात जनावरांना सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा, संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याऐवजी गुजरात मधून मुंबईला दूध पुरवठा करणारं हे सरकार, संवेदनशील नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.



 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल पहाटे औरंगाबादहून नागपूरकडे दूध घेऊन जाणारे चार टँकर जालना वळण रस्त्यावर अडवले आणि त्यातल्या एका टँकरमधलं दूध रस्त्यावर ओतून दिलं. मात्र त्यानंतर पोलिस बंदोबस्तात सगळे टँकर नागपूरकडे रवाना झाले.



 दूध बंद आंदोलना दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं शाळकरी मुलांना दुधाचं वाटप करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यात येणारे दुधाचे टेम्पो काल पहाटे अडवण्यात आले होते.

****



 सावंतवाडी संस्थानच्या राणी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या सत्वशीलादेवी यांचं, गंजिफा खेळाला प्रोत्साहन देण्यात  महत्त्वाचं योगदान आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राज्यातल्या रास्त भाव दुकानात लोह आणि आयोडिन युक्त मीठ स्वस्त दरात उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. शासनाचा  अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि टाटा आयर्न यांच्या संयुक्त विद्यमानं ही योजना राबवली जाणार आहे.

****



 औरंगाबाद शहरातला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शहरातल्या कचरा प्रश्नी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत काल विधान भवनात बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कचरा व्यवस्थापनासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगून कचारा व्यवस्थापन वेळेत न केल्यास सक्त कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. औरंगाबाद शहरातल्या पाणी आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासही महापालिकेनं प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्री म्हणाले. महापालिकेच्यावतीनं कचरा विघटनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली.

****



 दरम्यान, औरंगाबाद इथं चिकलठाणा, हर्सुल सावंगी, पडेगाव या भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या कचरा समस्येवर आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. औरंगाबाद शहरातली समांतर जल वाहिनी, स्वच्छता गृह, रस्ते बांधणी, इत्यादी विकास कामांसंदर्भात कालबद्ध पाठपुरावा घेण्याचे निर्देश नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांना देण्यात येतील, असं पाटील म्हणाले. या प्रश्नावर बोलतांना आमदार सुभाष झांबड यांनी औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली.

****



 दरम्यान, औरंगाबाद शहरातला कचरा पडेगाव परिसरात पूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्या शिवाय नवीन कचरा टाकू  देणार नाही, अशी भूमिका घेत काल नागरिकांनी आंदोल केलं. महापालिकेचे कचरा टाकण्यासाठी आलेले ट्रक नागरिकांनी अडवून धरले.

****



 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी औसा तालुक्यातल्या संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची लवकरात लवकर निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. मागच्या चार वर्षांपासून हा साखर कारखाना बंद असल्यामुळे सुमारे सात हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

****



 परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात प्लास्टीक बंदी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या ३० हजार १६७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणातला पाणीसाठा सध्या २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचं, जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात कव्हेदंड इथं, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सराटी इथं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं, नातेपुते माळशिरस मार्गावर मांडवी ओढा इथं गोल रिंगण झालं.



 शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज सोलापूरहून तर अमळनेरहून निघालेली संत सखाराम महाराजांची पालखी करमाळा इथून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

****



 मराठवाडा आणि विदर्भातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या एका दुग्ध विकास योजनेतून राज्यातल्या सत्तावीस हजार दूध उत्पादकांना लाभ झाल्याचं सरकारनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळानं सुरू केलेल्या या योजनेद्वारे सुमारे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी या भागातल्या सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे.

*****

***

No comments: