Saturday, 21 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 21 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देत असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा हा आपल्या सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या शहाजहानपूरमध्ये शेतकरी कल्याण मेळाव्यात बोलत होते. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असून ऊसाचा भाव २७५ रुपये प्रती क्विंटल केला आहे. ऊसाचे हे दर उत्पादन खर्चापेक्षा ८० टक्के अधिक असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे सरकारने १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये सुमारे २०० ते १८०० रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. 

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा येईल, असं अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या २८व्या बैठकीत बोलत होते. या व्यवस्थेची योग्य परिपूर्ती आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यास जनतेला फायदा होणार असून अनेक वस्तू आणि सेवा या स्वस्त दरात उपलब्ध होतील असं ते म्हणाले.

****

प्लास्टिकच्या कायमस्वरुपी वापराचा मार्ग आपण शोधला पाहिजे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत प्लास्टिक निर्यात प्रसार परिषदेत बोलत होते. त्यामुळे प्लास्टिकला जैविक रुपात बदलण्यासाठी तसंच त्याचा पुनर्वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि पुनर्वापर होण्यासाठी संशोधन करणं गरजेचं असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. 

****

केंद्र सरकार इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत सामंजस्य करार करून वैद्यकीय शास्त्राशी संबंधित १० नवीन अभ्याक्रम सुरू करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या अभ्यासक्रमांद्वारे १४ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

राज्यात एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असून, आजपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार वृक्ष लागवड झाली आहे. आजपर्यंत सर्वाधिक वृक्ष लागवड नांदेड जिल्ह्यात झाली असून ती ६८ लाख ६४ हजार इतकी आहे. त्यापाठोपाठ नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही जास्त प्रमाणात वृक्ष लागवड झाली. लातूर, बीड, जळगाव, जालना, पुणे, हिंगोली आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाली असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

****

मालवाहतुकदारांच्या देशव्यापी संपाच्या आज दुसऱ्या दिवशी, नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या संपाचा परिणाम जाणवत नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भाजीपाला मार्केटमध्ये आज ६६० गाड्यांची आवक झाली. कांदा-बटाटा मार्केटमध्येही दर स्थिर आहेत. मात्र संप असाच सुरू राहिला तर सहा दिवसांनी कांदा-बटाट्याच्या दरांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

****

गुरुपोर्णिमेसाठी शिर्डी इथं जाणाऱ्या भक्तांसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद-नगरसोल-हैदराबाद अशी एक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबाद-नगरसोल ही विशेष गाडी २६ जुलै रोजी हैदराबाद इथून दुपारी सव्वा तीन वाजता निघेल आणि निजामाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे नगरसोल इथं २७ जुलै रोजी सकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी नगरसोल इथून २९ जुलैला सायंकाळी साडे पाच वाजता सुटेल आणि ३० तारखेला सकाळी साडे आठ वाजता हैदराबादला पोहोचेल.

****

दरम्यान, पंढरपूर इथं परवा साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त १२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी नांदेड विभागातून आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद, नगरसोल -पंढरपूर- नगरसोल, अकोला-पंढरपूर-अकोला, बिदर-पंढरपूर-बिदर या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

****

मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजानं आंदोलन सुरु केलं आहे.

हिंगोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन सुरु करण्यात आलं.

दरम्यान, जवळाबाजार इथं सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात तीन बसेसवर दगडफेक झाल्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

धुळे शहरातही जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात महाकाळा इथं आज दुपारी रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

****

No comments: