Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचे सर्वतोपरी
प्रयत्न; मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना शांततेचं आवाहन
Ø येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
Ø मराठवाड्यात विविध जिल्ह्यात अद्याप आंदोलन सुरू
Ø
हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल जेद्दाहला रवाना
आणि
Ø विविध देशांमधल्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची
चमकदार कामगिरी
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आंदोलकांनी शांतता
राखून सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल
मुंबईत मराठा आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीला भाजपाचे
खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत
मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळाल्यावर महिनाभरात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा आंदोलकांविरूद्धचे गुन्हे मागं घेतले जात असून, मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना
अभय दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत यापूर्वी
सरकारनं घेतलेल्या निर्णयांची चोख अंमलबजावणी व्हावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊ,
त्यात स्थानिक पातळीवर सहकार्य आवश्यक आहे,
असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
दरम्यान, मुंबईत काल मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक
झाली, त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही, असं
या मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे. काल लातूर इथं झालेल्या बैठकी नंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं
ही माहिती देण्यात आली. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत असून, या आंदोलनात
झालेल्या मृत्यूंना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी
आंदोलन करण्यात येणार असून, एक ते आठ ऑगस्ट दरम्यान मराठा खासदार आणि आमदारांच्या घरासमोर
आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापुढचं आंदोलन राज्यभर एकसंघपणे राबवलं
जाणार असल्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं.
****
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काल परळी
मधल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांची
भूमिका असणारं एक निवेदन देऊन त्यांनी यावेळी आंदोलकांबरोबर चर्चा केली.
****
परभणी जिल्ह्यात आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून
विस्कळीत झालेलं जनजीवन कालपासून पूर्वपदावर येत असलं, तरीही तणाव कायम आहे. जिल्ह्यातली
बस सेवाही सहा दिवसांपासून बंद आहे. जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या इरळद इथं काल
दुधना नदी पात्रात जलआंदोलन, तर पूर्णा तसंच पाथरी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात
आलं.
नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी
काल परभणी इथल्या आंदोलनाचा आढावा घेतला, तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांचीही
भेट घेतली.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा
इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी रस्त्यावर रबरी चाकं पेटवून दिल्यामुळे
वाहतुकीवर परिणाम झाला. जाफराबाद तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या
अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथले तरूण शेतकरी कचरू दिगंबर कल्याणे यांनी काल आत्महत्या
केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड
जिल्ह्यात महाड जवळ परवा शनिवारी आंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातले सर्व ३० मृतदेह काल
दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातात ठार झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं
प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे, तर जखमी झालेले एकमेव प्रवासी
प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.
****
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं देशातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची तीन दिवसीय परिषद झाली, यात
दहा सूत्रे असलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला.
****
पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत यात्रा असून, ही
वारी शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी
वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ४६व्या भागातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. संत
ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत
रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत
असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा
अनुभव घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
पर्यावरण संवर्धन, शिक्षण, तंत्रज्ञान, आदी विषयांवरही
पंतप्रधानांनी भाष्य केलं. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी
अभिनंदन केलं.
*****
हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल मुंबईहून रवाना
झाला. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यावेळी विमानतळावर उपस्थित
होते. राज्यातल्या साडे अकरा हजारांहून अधिक भाविकांसह विक्रमी एक लाख, ७५ हजार, पंचवीस नागरिक हजयात्रेला
जाणार असून त्यात ४७ टक्के महिला आहेत. यातील
एक हजार, ३०८ महिला विना मेहरम अर्थात पुरुष सहप्रवाशाशिवाय जात आहेत.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या विमानतळावरुनही ७८ पुरुष
आणि ६८ महिलांचा समावेश असलेला हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था जेद्दाहला रवाना झाला.
परवा एक ऑगस्टपर्यंत चार वेगवेगळ्या विमानांनी साडेपाचशे यात्रेकरु औरंगाबादहून जेद्दाहला
जाणार आहेत.
****
जालना
जिल्ह्यात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे एक
लाख लाभार्थी आहेत. या पैकी जिल्ह्यातल्या ३६ हजार लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत गॅस
जोडणीसाठी अर्ज केले असून, २७ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली आहे. जिल्ह्याच्या
अंबड तालुक्यातल्या शहागड इथल्या अजरबी बाबू शेख या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील
एक लाभार्थी आहेत. आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीकडे या शब्दात व्यक्त केला
-
मी अजरबी बाबू शेख. राहणार शहागड जालना.
पूर्वी आम्ही चूलिवर स्वयंपाक करायचो, त्यामुळे सरपण आणायचं त्यामुळे धूराचा त्रास
होता. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस जोडणीसाठी मिळाली. आता धूराचा त्रास
होत नाही. काम पूर्ण वेळात होते. उज्ज्वला गॅसचा आम्हाला फायदा झाला.
****
लातूरच्या बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या
कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत शिवशंकर बिडवे यांच्या नेतृत्वातील सदस्यांच्या गटानं
विजय मिळवला आहे. यासाठी काल सकाळी मतदान आणि दुपारनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला.
या निवडणूकीत विधीज्ञ सांबप्पा गिरवलकर यांच्या नेतृत्वाखालील गट पराभूत झाला.
****
भारतीय क्रीडापटूंनी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या
क्रीडा स्पर्धांमध्ये काल चमकदार कामगिरी केली आहे.
रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ
वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतपद
पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं जपानच्या कोकी वातानबे याचा १८ - २१, २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र रोहन
कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला
पराभव पत्करावा लागला.
****
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अमेरीकेसोबतचा
सामना बरोबरीत सोडवून आपलं आव्हान कायम राखलं आहे. इग्लंडच्या लंडन इथं काल झालेला
स्पर्धेच्या इ गटातला हा अखेरचा साखळी सामना एक-एक अशा बरोबरीत राहिला.
****
फिनलँड इथं सुरू असलेल्या साओ क्रीडा स्पर्धेत भारताच्या
नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. नीरजनं ८५ पूर्णांक ६९ मीटर
अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं.
****
तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्ण तर संदीप तोमरनं रौप्यपदक पटकावलं आहे. महिलांच्या
गटात पिंकीनं सुवर्ण तर सीमा, पूजा धांडा, रजनी यांनी रौप्यपदक जिंकलं आहे. गीता फोगाट
हिला ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
वेदना हे श्रेष्ठ साहित्य निर्मीतीचं बीजकारण असल्याचं
मत ९० व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त
केलं आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्काराचं वितरण काळे
यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोहरीर वाङमय पुरस्कार
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या 'लक्षणीय असे काही' या पुस्तकाला, नरहर कुरंदकर वाङमय
पुरस्कार प्रसाद कुमठेकर यांच्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकाला, म.भि.चिटणीस
वाङमय पुरस्कार कैलास इंगळे यांच्या 'वाङमयीन मराठवाडा' या पुस्तकाला, कुसुमावती देशमुख
काव्यपुरस्कार डॉ.पी.विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या काव्यसंग्रहाला देण्यात आला,
कुमार देशमुख नाट्यपुरस्कार राजीव नाईक यांच्या 'लागलेली नाटकं' या पुस्तकाला तर रा.ज
देशमुख स्मृती पुरस्कार निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. बँकेच्या
सर्व शाखांमध्ये ३१ जुलै पर्यंत संबंधीतांचे अर्ज आणि पिक विमा हप्ता स्वीकारुन येत्या
१३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात
आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment