आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जुलै
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
निर्यात क्षेत्राला प्राधान्यक्रम कर्ज वितरण श्रेणीत
समाविष्ट करण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग
मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेला
येत्या २०३५ मध्ये दहा ट्रीलीयन अमेरीकी डॉलरचं उद्दीष्ट गाठण्यासाठी याची मदत होणार
असल्याचं प्रभु यांनी नमूद केलं. भारतातून होणारी निर्यात लक्षणीय असून, त्यात वाढही
होत असल्याचं ते म्हणाले.
****
द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष
एम. करुणा निधी यांची प्रकृती आता स्थिर आहे. चेन्नईच्या
कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. करुणा
निधी यांच्या वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालात त्यांची प्रकृती पूर्वपदावर येत
असल्याचं म्हटलं आहे. त्यांना सतत जीवरक्षक यंत्रणेचा आधार देण्यात येत असल्याचं
रुग्णालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ल्याची
धमकी देणाऱ्या एका इसमाला मुंबई पोलिसांनी वाळकेश्वर इथून अटक केली आहे. काशिनाथ मंडल
असं त्याचं नाव असून, तो झारखंडचा रहिवासी आहे. मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या
काशिनाथनं राष्ट्रीय सुरक्षा रक्षक - एनएसजीला फोन करून, पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची
धमकी दिली, एनसजीनं याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या पाली-भुतीवली
इथल्या धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृत दोघेही मुंबईच्या विक्रोळी भागातले
रहिवाशी आहेत. काल रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमे नंतर दोघांचे मृतदेह
हाती लागले. या धरणात पोहण्यास बंदी असताना देखील दोन तरूण धरणात उतरले, मात्र पाण्याचा
अंदाज न आल्यानं ते बुडाले.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. बँकेच्या
सर्व शाखांमध्ये ३१ जुलै पर्यंत संबंधीतांचे अर्ज आणि पिक विमा हप्ता स्वीकारुन येत्या
१३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात
आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment