Friday, 20 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

राफेल विमान खरेदी प्रकरणी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देशाची दिशाभूल केल्याचा आरोप, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारविरोधात दाखल अविश्वास प्रस्तावावर ते आज लोकसभेत बोलत होते. केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर, तसंच रोजगार, जीएसटी, विमुद्रीकरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी टीका केली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी, राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले. संरक्षण विभागाच्या कराराचे मुद्दे जाहीर करता येत नसल्याचं, त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे पुरेसं संख्याबळ असूनही, अविश्वास प्रस्ताव स्वीकारून सरकारनं सशक्त लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आंध्र प्रदेश राज्याला जी काही मदत लागेल ती केंद्राकडून दिली जाईल, असं आश्वासन देत सिंह यांनी, गेल्या चार वर्षात सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली.

तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी या प्रस्तावाच्या बाजुनं बोलताना, देशातला शेतकरी आर्थिक अडचणीत असताना, पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करणं योग्य नसल्याचं मत मांडलं. तेलंगणा राष्ट्र समितीचे विनोदकुमार बोयनपल्ली, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारीक अनवर यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मत मांडलं. या चर्चेनंतर आजच अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे.

****

जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याबाबतच्या विधेयकाला आज विधान परिषदेनं एकमतानं मंजुरी दिली. बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त येत्या ११ ऑगस्टला या विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा होणार आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा विधेयकही आज विधानपरिषदेनं संमत केलं. या विधेयकातल्या सुधारणेनुसार, जलसंधारण महामंडळामध्ये ४२३ पदांची भरती करता येणार असून, आणखी एक उपाध्यक्ष नेमता येणार आहे.

****

विधान परिषद सभागृह हे वैयक्तिक भांडणाचं सदन नाही, त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूच्या सदस्यांनी योग्य संयम बाळगून वक्तव्य करावीत, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित करत, गेल्या काही दिवसात विधानपरिषदेतलं वातावरण गढूळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती. टीका करताना वैयक्तिक, असंसदीय वक्तव्य या सभागृहात होणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याबाबत मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली. कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत १५ हजार ८८२ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबई इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना इथल्या उपकेंद्रात पुढच्या महिन्यापासून नियमित तासिका सुरू होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष खा़सदार रावसाहेब दानवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. इमारत उभारणीचं काम पूर्ण होईपर्यंत जालना औद्योगिक वसाहतीमधल्या बैजो शीतल सिड्सच्या इमारतीत तासिका घेण्यात येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं स्वागत केलं आहे. यापूर्वीही अशा घोषणा झाल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं, किसान सभेचे अजित नवले यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यावेळीही असा विश्वासघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल, असं त्यांनी नमूद केलं. 

****

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज परभणी शहरात उमटले. काही अज्ञात व्यक्तींनी चार बसेसवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लातूर इथंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. 

****

राज्यात आजही अनेक भागात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारच्या सुमारास थोडा वेळ मुसळधार पाऊस झाला. परभणी शहरातही आज समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...