Tuesday, 31 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत ४० लाख लोकांचं नागरिकत्व अवैध ठरवल्याचा मुद्दा उपस्थित करत, राज्यसभेत आज तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी सभागृहाचं कामकाज बाजूला ठेऊन या मुद्यावर चर्चेची मागणी केली. या संवेदनशील आणि गंभीर मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह निवेदन देतील, असं सभापतींनी सांगितलं, मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं सभापतींनी कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं.

 कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विविध पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर आपली मतं मांडली.



 देशभरात विविध राज्यांमध्ये घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना राज्यसरकारंही देशाबाहेर काढू शकतात, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या रोहिंग्या घुसखोरांच्या विषयावर बोलत होते. गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना, रोहिंग्या घुसखोर हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करत, त्यांना म्यांमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं.

****



 राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिका हा उपक्रम धर्माशी संबंधित नाही, तर राज्यात राहणारे नागरिक भारतीय आहेत किंवा नाहीत हे निश्चित करण्यासाठी आहे, असं भाजपाचे आसामचे प्रवक्ते सईद मामीनुल अवॉल यांनी म्हटलं आहे. तर आसाम गण परिषदेचे प्रवक्ते तपन दास यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिकेच्या नावाखाली कुठलंही कारस्थान आपला पक्ष यशस्वी होवू देणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

****



 जमावाकडून होणाऱ्या हत्या प्रकरणातल्या दोषींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक केंद्र सरकार लवकरच आणणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नाथजोगी समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली. १२ वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकाच्या धर्तीवर हे प्रस्तावित विधेयक असेल, असं ते म्हणाले.

****



 सरकारनं वस्तू आणि सेवा कर विवरण अर्जाचे नवीन मसुदे प्रसिद्ध केले आहेत. सहज आणि सुगम या नावानं प्रसिद्ध केलेल्या या मसुद्यांवर तज्ज्ञांची मतंही मागवली आहेत. जे व्यवसाय फक्त ग्राहकांना सेवा देतात त्यांच्या साठी सहज हा अर्ज, आणि जे व्यवसाय ग्राहक आणि अन्य व्यवसाय या दोन्हीशी संबधीत आहेत त्यांच्यासाठी सुगम हा अर्ज असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं म्हटलं आहे. हे अर्ज जानेवारी २०१९ पासून अंमलात येतील.

****



 मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांमुळे आलेला परतीचा कचरा अत्यंत चिंताजनक असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानव्यक्त केलं आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनकचरा नियोजनाबाबत तातडीनमार्गदर्शक तत्वनिश्‍चित करावीत, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****



 राज्यात लोक सहभागातून १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण झाला असल्याचं वन सचिव विकास खारगे यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं वृक्ष लागवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सर्व स्तरातल्या नागरिकांचं सहकार्य लाभलं असून, आता वृक्षसंगोपनाचं काम सुरु करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****



 पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या ३७ पूर्णांक ५० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यामधले ९१ प्रकल्प तळाला गेले असून, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, बुलडाणा आणि खामगाव या तालुक्यामध्ये पावसाची तूट ३३ टक्क्यापासून ते १७ टक्क्यापर्यंत आहे. आगामी दोन महिन्यात अपेक्षीत असा पाऊस न झाल्यास पिकोत्पादनासाह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****



 चीन मधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणित दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. साईप्रणितला थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला, तर श्रीकांतनं पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या नहात नगुयेनचा २१ - १५, २१ - १६ असा पराभव केला. महिला एकेरीत उप -उपान्त्यपूर्व फेरीत सायना नेहवालचा सामना आज तुर्कस्तानच्या आलिये देमिर्बग विरुद्ध, तर पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या फित्रीयानी विरुद्ध होणार आहे.

****



 लंडनमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज इटली विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताला उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे. 

*****

***

No comments: