Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v मराठा आरक्षण प्रकरणी, हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता
चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
v औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन आमदारांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
राजीनामे
v फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक-२०१८ संसदेत मंजूर
आणि
v बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना काल औरंगाबाद इथं अटक
****
मराठा आरक्षण प्रकरणी, हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब
न करता सकल मराठा समाजानं राज्य शासनाशी चर्चा करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून
होणारी आंदोलनं, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खद आहेत.
काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
त्यांनी राज्याच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन सहकार्य करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं.
सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यभरात काढलेल्या शांततापूर्ण मोर्चांची दखल घेत,
राज्य सरकारनं विविध प्रकारचे निर्णय घेतलेले असून, आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यासाठी
राज्य सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असून, राज्य
सरकार आपल्या अधिकारातल्या सगळ्या बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. महाभरतीच्या संदर्भात सकल मराठा समाजाच्या
मनात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबतही चर्चा करून सर्वमान्य निर्णय घेणं शक्य आहे, असं
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्या गांभीर्यानं घ्याव्यात, आणि त्याकरता विधिमंडळाचं विशेष
अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यातली परिस्थिती चिघळल्याचा आरोप करत, राज्यपालांनी
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली. औरंगाबाद अहमदनगर रस्त्यावर प्रवरासंगम इथल्या
पुलाचं, काकासाहेब शिंदे पूल, असं नामकरण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातले कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन
जाधव आणि वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी
मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारनं तत्काळ आरक्षणाचे आदेश जारी करावेत
अन्यथा आपण राजीनामा देऊ असा इशारा आमदार जाधव यांनी मंगळवारी दिला होता. त्यानुसार
काल त्यांनी आपला राजीनामा दिला. तर आमदार चिकटगावकर यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या
मतदारसंघातला तरूण जलसमाधी घेऊन हुतात्मा झाला आहे, असं सांगत मराठा समाजाचा स्वाभिमान
लक्षात घेऊन, आपण सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं, विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या
पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि नाशिक
शहरात काल पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ता
रोको आंदोलन करत वाहतुक अडवून धरली.
औरंगाबाद शहरात क्रांती चौकात काल सलग पाचव्या दिवशी
ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सिडको भागात बसवर दगडफेकीच्या घटना काल घडल्या. हिंगोली आणि जालना जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद
मिळाला. जालना जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. भोकरदन इथं आंदोलकांनी मुंडन
करून सरकारचा निषेध केला. अंबड तालुक्यात सोलापूर- औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करताना
आंदोलकांनी टायर पेटवून दिल्यानं वाहतूक विस्कळीत झाली, या भागात दोन बसेसवर दगडफेक
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातही बससेवा बंदच होती.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं आंदोलकांनी वन विभागाचं
वाहन पेटवून दिलं. साताऱ्यात दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांना
अश्रुधुराचा वापर करावा लागला. या कारवाईत पोलिस अधीक्षकांसह पाच पोलिस कर्मचारी जखमी
झाले. वाशिम जिल्ह्यात बंदसह चक्काजाम करण्यात आला.
****
मराठा समाज तसंच धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या
मुद्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेचं
लक्ष वेधलं. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे, सरकारनं यासंदर्भात
लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
माल वाहतुकदारांच्या संपाकडे कोल्हापूरचे खासदार
धनंजय महाडिक यांनी लोकसभेचं लक्ष वेधलं. इंधनाचे
दर कमी करावेत, पथकर तसंच विम्याचे हप्ते कमी करावेत, या मागणीसाठी माल वाहतुकदारांनी
संप पुकारला आहे.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसनं काल लोकसभेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरुद्ध हक्कभंग
प्रस्ताव दाखल केला. राफेल खरेदीबाबत संसदेत दिशाभूल करणारी चुकीची माहिती सादर केल्याचं
नमूद करत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्धही, भाजपा खासदार अनुराग ठाकूर
यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
****
फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक-२०१८ संसदेत मंजूर
झालं आहे. काल राज्यसभेत या विधेयकावर चर्चा
होऊन ते संमत करण्यात आलं. लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. कर आणि कर्ज विषयक गुन्हे करुन देशाबाहेर फरार होणाऱ्यांची, शंभर कोटी
रुपयांहून जास्त किमतीच्या मालमत्तांची जप्ती, तसंच कायद्याच्या
पकडीतून सुटण्यापासून रोखण्याचे मार्ग, या विधेयकानं प्राप्त होणार
आहेत, याबाबत विशेष न्यायालयही स्थापन केलं जाणार आहे.
****
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. १९ वर्षांपूर्वी
याच दिवशी भारतीय सैन्यानं, पाकिस्तान कडून होणारी घुसखोरी परतवून लावत विजय मिळवला
होता. या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज विविध ठिकाणी अभिवादनपर
कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
****
बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा
जणांना काल औरंगाबाद इथं अटक करण्यात आली त्यांच्या कडून सात लाख सोळा हजार रुपये दर्शनी
मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
समाजकार्य विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण
घेणारा विद्यार्थी दिशांत साळवे आणि नांदेडचा व्यापारी सय्यद मुसद्दीक अली सय्यद सादात
अली, अशी या दोघांची नावं असून, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हिंगोलीचा नसरुल्ला पठाण
फरार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. साळवे यानं या पूर्वीही
अडीच लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा चलनात आणल्या असल्याची माहिती समोर आली
आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूरचे माजी आमदार वैजनाथराव
आकात यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. १९८५ मध्ये परतूर मतदारसंघातून
काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांच्यावर आज परतूर
इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका महिलेनं सावकारी जाचाला
कंटाळून काल मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अंगावर
रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंडा तालुक्यातल्या शिरगिरवाडी इथली रहिवासी असलेल्या या महिलेला,
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला.
****
सिगारेटसह
तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती लावणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागासह पोलिस
प्रशासन एकत्रित कारवाई करणार असल्याचं औरंगबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव
प्रसाद यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक काल
औरंगाबाद इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
मराठवाड्यात मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि मुस्लिमांवर
अन्याय आणि अत्याचार होत असल्याचा आरोप करत, रिपब्लीकन सेनेच्या वतीनं काल सकाळी जालना
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनं करण्यात आली. संभाजी भिडे यांना अटक करावी,
यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं, एक कनिष्ठ अभियंता
आणि आणि एका कनिष्ठ लिपिकाला काल पाच हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
रंगेहाथ अटक केली. दिलीप कांबळे असं कनिष्ठ
अभियंत्याचं तर विशाल मस्के लिपिकाचं नाव असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागात सिंचन
विहरीचं देयक अदा करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.
****
नाशिक
इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेनं, डॉक्टर
सुभाष भोयर यांची भारतीय दंत परिषदेसाठी, तर, डॉक्टर
श्रीकांत देशमुख यांची व्यवस्थापन परिषदेसाठी, विद्यापीठाचे
प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. निवड झालेले दोन्ही डॉक्टर सध्या औरंगाबादच्या छत्रपती
शाहू महाराज शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत.
****
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं दिले जाणारे
पुरस्कार जाहीर झाले असून, पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना तर, बाबुराव जक्कल स्मृती जिल्हास्तरीय पुरस्कार
सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग संगा, यांना जाहीर झाला आहे.
****
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून पैठणच्या
जायकवाडी धरणात होणारी आवक मंदावली आहे. सध्या धरणात सुमारे साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणातला पाणीसाठा ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment