आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
आज मराठा संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोका इथं काल एका तरुणानं गोदावरी नदी पात्रात उडी मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता, या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर केलेल्या खोट्या
आरोपांवर माफी मागावी, आणि येत्या दोन दिवसात आरक्षणा विषयी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचे
तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा संघटनेनं दिला आहे.
पंढरपूर इथं वारीसाठी गेलेल्या भाविकांना परती प्रवास करता यावा, यासाठी पुणे
मुंबई आणि सोलापूर ही तीन शहरं आजच्या बंदमधून वगळण्यात आली असून, या ठिकाणी उद्या
बंद पाळण्यात येणार असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
****
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जालना इथं मराठा लोक प्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केलं
जात आहे. जालना शहरातून मोर्चा काढला जाणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. उद्या २५ जुलै रोजी शासकीय कार्यालय बंद आंदोलन
तर परवा २६ जुलै रोजी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
****
समाजातल्या शेवटच्या घटका पर्यंत शासनाच्या सेवा
पोहोचतील या ध्येयानं कार्यरत राहून, सनदी अधिकाऱ्यांनी सदैव मदतीचा भाव ठेवावा, असं
आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली
इथं, ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेतल्या गुणवंताच्या कौतुक सोहळ्यात बोलत होते.
****
नक्षलग्रस्त भागात टेलीकॉम सुविधा उपलब्ध करणं, युवकांसाठी
कौशल्य विकास केंद्र उभारणं, बँकिग सुविधांचं जाळं निर्माण करणं यावर भर देण्यात येत
असून, यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सहकार्य करावं असं आवाहन, मुख्य सचिव
दिनेश कुमार जैन यांनी केल आहे. कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांनी काल महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्य सचिवांशी दूर दृष्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment