Friday, 27 July 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.07.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २७ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****

·       मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·       मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या अनेक भागात अद्याप आंदोलन सुरु

·       आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार - ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे

·       राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक

आणि

·       भारत वाटवानी आणि सोनम वांगचूक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

****

मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या संदर्भात गंभीर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत बोलत होते. काही नेते मराठा आरक्षण मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

****

कुठल्याही तरुणानं आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी जीव गमावू नये, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी तसं केलं नाही, अशी टीका, ठाकरे यांनी काल जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातू केली आहे. कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, हे सरकारनं सविस्तर सांगावं, नाही तर सत्तेत राहू नये, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अजुनही अनेक भागात सुरु आहे. परभणी शहरात काल आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलिस शिपायासह अनेक जण जखमी झाले. जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

जालना शहरासह भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, आदी तालुक्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूर इथं वाहनांवर दगडफेक झाली. हिंगोली जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी एकही बस धावली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं आंदोलकांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा इथं अज्ञातांनी एस टी बस पेटवून दिली. नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ४७ आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. या सगळ्यांना ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचं ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून परळी इथं सुरु असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन मुंडे यांनी आंदोलकांसमवेत चर्चा केली. शासनानं मराठा समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

****

दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या दोन आमदारांनी काल मराठा क्रांती समाजाच्या समन्वयकांकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले. मात्र हे राजीनामे अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे दिले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

राज्यातल्या आणखी काही आमदारांनी राजीनामे दिल्याचं वृत्त असून, हिवाळी अधिवेशनापूर्वी या राजीनाम्यांवर विचार करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे.

जालना नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. तर भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

****

राज्यातल्या वैद्यकीय महविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आता अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यातल्याच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं, यासाठी ८५ टक्के जागांवर किमान १५ वर्षांचा अधिवास तसंच दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्यातूनच उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परराज्यातून प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे, राज्यातले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत बाद होत असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं हा निर्णय दिला. 

****

अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल केले नसल्याचं सरकारनं काल लोकसभेत सांगितलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही बाब स्पष्ट केली. याबाबत न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यावर सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ राज्यातल्या अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींना व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीनं या योजनेचं स्वतंत्र वेबपोर्टल विकसित करण्यात येत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. हे वेबपोर्टल येत्या नऊ ऑगस्ट पासून सर्वांना उपलब्ध होईल.

****

२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्रं भरण्याच्या मुदतीत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. या आधी कर विवरणपत्रं भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपणार होती.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारत वाटवानी आणि सोनम वांगचूक या दोन भारतीयांना या वर्षीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातल्या मानसिक आजारानं ग्रासलेल्या निराधारांवर उपचार करताना दाखवलेल्या विलक्षण धैर्याबद्दल वाटवानी यांना, तर सामुहिक शैक्षणिक सुधारणा राबवून विशेषतः लडाखमधल्या युवकांना जगण्याच्या नवनव्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल, ५१र्षीय वांगचूक यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १९५७ सालापासून सुरु झालेला हा पुरस्कार, आशियाई स्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार असून, नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. या वर्षी एकूण सहा जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

कारगील विजय दिवस काल साजरा करण्यात आला. १९ वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय सैन्यानं, पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी परतवून लावत विजय मिळवला होता. या युद्धातल्या हुतात्म्यांना काल औरंगाबादसह विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल जेट विमान खरेदी प्रकरणाची खरी माहिती लपवून जनतेचा विश्वासघात करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा सरकारचा हा ४१ हजार कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा असल्याचं चव्हाण म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी कॉंग्रेसतर्फे येत्या सोमवारी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी यावेळी सांगितलं.

****

गायींच्या प्रजननासाठी औरंगाबादमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात त्यांनी काल हर्सुल इथं जागेची पाहणी केली. या प्रयोगशाळेसाठी ३५ कोटी रूपये मंजूर झाले असून राज्यात औरंगाबाद आणि नागपूर या दोनच ठिकाणी ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पशुसंवर्धन विभागात वर्षअखेर एक हजार ४६ नव्या पदांची भरती होणार असून इतर वरिष्ठ पदे ही राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन येत्या एक आणि दोन ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. शेकापनं अलिबाग इथं एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्दघाटन होणार आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.

****

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यात, पन्नगेश्वर साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. राज्यात सुरु असलेल्या जातीय राजकारणाबद्दल मुंडे यांनी यावेळी खंत व्यक्त केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येत असून, विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा आणि वाढलेल्या मुदतीचा लाभ घेऊन नैसर्गिक आपत्तीवर संरक्षण मिळवून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात माहूर गडावर काल, पन्नास हजार सीड बॉल्स ची लागवड करण्यात आली. यावेळी नांदेड वन विभागाचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, आमदार प्रदीप नाईक, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डच्या 'पाण्याचा कार्यक्षम वापर' या राज्यस्तरीय अभियानाला अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथून प्रारंभ झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची सुरुवात झाली. या माध्यमातून राज्यात १० जिल्ह्यातल्या पाच हजार गावांमध्ये पाणीवापराबाबत जनजागृती केली जाणार आहे .

//***********//






















































No comments: