Wednesday, 25 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURNAGABAD 25.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५  जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीनं आज पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम जाणवण्यास सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पाण्यात उतरून आंदोलन करता येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनानं नदीकाठी विशेष पथकं तैनात केली आहेत. अहमदनगरच्या बसस्थानकावरची बससेवा पूर्ण बंद असून, जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चानं जाहीर केलं आहे. पालघर आणि बोईसर शहरांमध्ये पूर्ण बंद असून खाजगी रिक्षा वाहतूकही बंद असल्याचं वृत्त आहे. रायगड जिल्हयात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातल्या एस.टी.वाहतुकीवर बंदचा मोठा परिणाम झाला आहे मात्र, कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या लाल चौक परिसरात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान आज पहाटे पासून सुरू असलेली चकमक आता संपली असून, सुरक्षादलानं केलेल्या कारवाईत लष्कर ए तोयबा या संघटनेचे दोन अतिरेकी मारले गेले. दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत केरन सेक्टर मध्ये सुरक्षादल आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक सुरू झाल्याचं वृत्त आहे.

****

 सरकार शासकीय इमारती दिव्यांगांस्नेही बनवत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या याबाबतच्या आदेशाचं सरकारनं पालन न केल्यानं न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयं दिव्यांगस्नेही, विशेषत: अंधस्नेही बनवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी घेण्यास न्यायालयानं होकार दिला असून, न्यायालयीन प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबतचं उत्तर मागितलं आहे.

****

 कंपनी कायद्यामध्ये असलेल्या सामाजिक दायित्वाशी संबंधित खर्चाच्या नियमांचं पालन न केल्याबद्दल सरकारनं दोनशे बहात्तर कंपन्यांना प्राथमिक नोटिस जारी केल्या आहेत. कंपनी कार्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. या कायद्यानुसार, काही श्रेणीतल्या, फायदा कमावणाऱ्या कंपन्यांनी आपल्या निव्वळ फायद्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणं आवश्यक आहे.

****

 महिला सुरक्षे संदर्भात असलेल्या कायद्यांची अधिक सक्षमपणे अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं, राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभेत काँग्रेसच्या कुमारी शैलजा तसंच समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी उपस्थित केलेल्या महिला सुरक्षे संदर्भातल्या मुद्यांच्या अनुषंगानं ते बोलत होते. या विषयावर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

 राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत केंद्र सरकारनं, देशातले, पुरेशा आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध नसलेले 256 जिल्हे, उच्च प्राधान्य जिल्हे म्हणून निश्चित केले आहेत. या जिल्ह्यांमध्ये आवश्यक त्या सुविधा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालनासह  12 जिल्ह्यांचा  समावेश आहे.

****

 पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं सुरू केलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- 2018” या उपक्रमांतर्गत येत्या 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि झारखंड मधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे. एका स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत होणार असलेल्या या सर्वेक्षणातून, स्वच्छतेचं प्रमाण आणि दर्जा या मानकांच्या आधारे संबंधित राज्यं आणि राज्यांमधल्या जिल्ह्यांचा गुणानुक्रम ठरणार आहे. महाराष्ट्रात पंढरपूर इथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ केला. राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी उत्तम  कामगिरी करावी असं आवाहन लोणीकर यांनी केलं आहे. या सर्वेक्षणात उत्तम ठरणाऱ्या राज्यांना आणि जिल्ह्यांना येत्या 2 ऑक्टोबरला सन्मानित केलं जाणार आहे.

****

 नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेनं, डॉक्टर सुभाष भोयर यांची भारतीय दंत परिषदेसाठी, तर, डॉक्टर श्रीकांत देशमुख यांची व्यवस्थापन परिषदेसाठी, विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. डॉ भोयर तसंच डॉ देशमुख सध्या औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत.

*****

***

No comments: