Saturday, 28 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८  जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनामध्ये वर्ष अखेर आपोआप वाढ करण्यात यावी, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात यावी, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. समान पद समान निवृत्ती वेतनाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून, याबाबत पाच वर्षांमधून एकदा आढावा घेण्यात येणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. या धोरणाचा थेट आर्थिक बाबीशी संबंध असल्यामुळे याबाबत न्यायालयीन आढावा घेण्यात येऊ नये, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

****



 जागतिक हेपिटायटिस दिनाच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विषाणूजन्य हेपिटायटिस नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात आज नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी साठी मोफत औषध आणि रोगनिदान सुविधा पुरवल्या जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****



 अनिवासी भारतीय - एन आर आय विवाहांमध्ये पीडित महिलांसाठी केंद्र शासनानं ठोस पावलं उचलली आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथंअनिवासी भारतीय - विवाह आणि महिला तस्करी समस्या आणि उपाय योजनाया विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यावेळी उपस्थित होत्या. अनिवासी भारतीयांसोबत झालेल्या विवाहांमध्ये महिलांची फसवणूक झाल्यास, फसवणूक करणाऱ्या पुरूषांना तसंच कुटुंबातल्या सदस्यांना कडक शिक्षा होईल असं गांधी यांनी सांगितलं.

****



 उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सात लोकांचा मृत्यू झाला आहे. आग्रा, मणीपूरी, सहारनपूर, मुजफ्फरनगर, कसगंज, मिरत आणि बरेली भागांमध्ये हे मृत्यू झाले आहेत, तसंच १२ जण जखमी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधान भवनात सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करेल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.



 दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आज नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव इथं रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या मागणीसाठी काल पिंपळगाव इथले प्रल्हादराव कल्याणकर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.

****



 केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं आज पवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं, पण असं न झाल्यानं आणि तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटल्याचं ते म्हणाले. सरकारनं घटनेत दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून, याबाबत विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.

****



 राज्यातल्या विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या सहा, पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या १९ आणि पोलिस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद इथल्या राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून अपर्णा गिते यांची, जालना इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी नामदेव चव्हाण, हिंगोली पोलिस अधिक्षकपदी योगेश कुमार, जालना पोलिस अधिक्षकपदी एस चैतन्य, उस्मानाबाद पोलिस अधिक्षकपदी राजा रामस्वामी, परभणी पोलिस अधिक्षकपदी कृष्णकांत उपाध्याय, नांदेड पोलिस अधिक्षकपदी संजय जाधव, लातूर पोलिस अधिक्षकपदी आर एस माने, तर औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्तपदी सी के मीना यांची बदली करण्यात आली आहे.

****



 नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोलिस आणि नागरिकांचं गोंदिया इथं स्मारक उभारण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील यांनी ही घोषणा केली. गोंदिया पोलीस विभागाच्या वतीनं आयोजित नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या समारोप सत्रात ते बोलत होते. नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून, नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमावणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असल्याचं ते म्हणाले.

****



 रशियात व्लादिवोस्टॉक इथं सुरु असलेल्या रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सौरभ वर्मा आणि मिथुन मंजूनाथ या दोन भारतीय खेळाडूंमध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. सौरभनं इस्राएलच्या मिशा झिल्बरमनचा २१ - १४, २१ - १६ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर मंजूनाथनं मेलेशियाच्या एस. रामचंद्रनला २१ - १८, २१ - १२ असं हरवलं आहे.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...