Friday, 20 July 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. बिजू जनता दलानं, या चर्चेत सहभागी होणार नसल्याचं सांगत, चर्चा सुरू होण्यापूर्वीच बिजू जनता दलाच्या सर्व १९ सदस्यांनी सभात्याग केला. शिवसेनेच्या सर्व सदस्यांनीही या चर्चेदरम्यान लोकसभेत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलगु देशम पक्षाचे खासदार जयदेव गल्ला यांच्या भाषणानं चर्चेला प्रारंभ झाला. गल्ला यांनी या प्रस्तावावर बोलताना, आंध्रप्रदेशावर होत असलेल्या अन्यायासाठी विद्यमान भाजपप्रणीत सरकार इतकाच काँग्रेस पक्षही जबाबदार असल्याचं नमूद केलं. आंध्रप्रदेशाच्या विभाजनानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश यांच्या तुलना करून, होत असलेल्या भेदभावाकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारवर विश्वास राहिला नसल्यानं, अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचं, गल्ला यांनी सांगितलं.

दिवसभराच्या चर्चेनंतर सायंकाळी या प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे.

****

विधान सभेत आज जात पडताळणी समितीच्या प्रलंबित प्रकरणांवरुन वादळी चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यानं काही प्रकरणं हेतुपुरस्सर अडवून ठेवल्याबद्दल, त्याला निलंबित करण्याची मागणी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून, गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीचे निर्देश दिले.

आमदार प्रशांत बंब, आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सर्रास सुरू असलेल्या गुटखा विक्रीकडे लक्ष वेधलं. राज्यात गुटखा बंदी असूनही, गुटखा विक्री सुरू असल्याबद्दल संबंधित अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली, तर प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि गुटखा व्यापाऱ्यांचं संगनमत असल्याचा आरोप बंब यांनी केला. लोकप्रतिनिधींनी गुटखा सेवन करू नये, असं आवाहन आमदार आशिष देशमुख यांनी केलं.

अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी, या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना, सर्व सदस्यांनी आपल्या सूचना सरकारकडे सादर कराव्यात, त्या आधारे गुटखा बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगितलं.

****

अनुसूचित जाती, जामाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदांच्या संख्येत कपात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत, शिक्षक भरती प्रक्रिया थांबवावी, असे निर्देश केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसीनं, देशातली सर्व विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. शैक्षणिक पदभरती प्रक्रियेत आरक्षित जागांची संख्या निश्चित करताना शैक्षणिक संस्थांऐवजी प्रत्येक विभागाला पाया मानावा असा आदेश यूजीसीनं दिला होता. यामुळे आरक्षित पदांच्या संख्येत लक्षणीय कपात होत असल्यानं, देशभरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त झाला होता. म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी थांबवून त्याचा पुनर्विचार करावा अशी याचिका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

****

खोट्या बातम्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सरकारनं व्हॉट्सॅपला आणखी एक नोटीस जारी केली आहे. अफवा पसरवण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर होत असेल ती मूक साक्षीदार बनून राहणार असतील, तर त्यांना गुन्ह्यातले साथीदार मानलं जाईल, आणि त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही सरकारनं दिला आहे.

****

जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात काल रात्री उशिरा, बारपोरा वनक्षेत्रात सुरु झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख पटली असून, तो पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

आषाढी वारी दरम्यान, उद्या बाजीराव विहीर इथं होणारा रिंगण सोहळा, भाविकांना अनुभवता यावा याकरता एस.टी च्या शंभर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे शंभर बसेस पाचशेहून अधिक फेऱ्या करणार आहेत.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भंडीशेगाव इथं मुक्काम करेल, त्यापूर्वी पालखीचं गोल रिंगण तोंडले बोंडले इथं होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज फिराची कुरोली इथं मुक्कामी असेल, तर संत एकनाथ महाराज तसंच संत सखाराम महाराजांची पालखी आज करकंब इथं मुक्काम करेल. शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज मंगळवेढ्यात मुक्काम असेल, तर उद्या सायंकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुषांच्या हॉकी संघांदरम्यान सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं चार - दोन असा जिंकला आहे. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.

****

बर्लिन इथं सुरु असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या चरणात भारतीय महिला कंपाउंड संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना उद्या फ्रान्स विरुद्ध होणार आहे.

//**********//


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...