आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारविरोधात दाखल
अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. लोकसभाअध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी
या चर्चेसाठी सात तासांचा वेळ निश्चित केला आहे. चर्चेनंतर आजच या प्रस्तावावर मतदान
होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही
आघाडी सरकारला निश्चितच बहुमत मिळेल, असं संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं
आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे लवकरच शंभर रूपयांच्या फिकट जांभळ्या रंगातल्या नवीन नोटा
जारी करण्यात येणार आहेत. या नोटांवर गुजरातच्या पाटणमधल्या सरस्वती नदीतीरावरच्या 'रानी
की बाव' या विहीरीचं चित्र असणार आहे. १०० रूपयांच्या आधीच्या
रंगातल्या नोटाही चलनात राहणार आहेत. मात्र नव्या नोटेचा आकार हा जुन्यापेक्षा काहीसा
लहान असणार आहे. यानंतर १०, ५० आणि ५०० रूपयांच्याही नव्या नोटा जारी करण्यात येणार
असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.
****
एअरसेल मॅक्सिस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल
केलेल्या पुरवणी आरोपपत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती
चिंदबरम यांचा आरोपी म्हणून समावेश केला आहे. याबाबत ३१
जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर
अधिकाधिक भर द्यावा असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातल्या
साखर कारखान्यांच्या समस्यांसदर्भात नागपूर इथं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. इथेनॉल
खरेदी बाबत केंद्र शासनाचं धोरण निश्चित झाल्यावर राज्य शासनही सकारात्मक धोरण निश्चित
करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
****
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या
पुरवठा विभागात दोन लाख रुपयांची लाच घेतांना पुरवठा निरीक्षक नितीन गर्जे याला लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहाथ पकडलं. भिंगार इथल्या एका स्वस्त धान्य
दुकानाविरूद्धची कारवाई टाळण्यासाठी गर्जे यानं दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी
केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जुलैला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६वा भाग
असेल.
****
No comments:
Post a Comment