Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२९ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत यात्रा असून, ही
वारी शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ४६व्या भागातून
ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. संत ज्ञानेश्वर, संत
नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत
रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत असल्याचं
ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा, असं
आवाहनही त्यांनी केलं.
देशात
अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर
काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा असल्याचं सांगून त्यांनी, मानवानं
निसर्गाला आव्हान दिल्यामुळे निसर्गही मानवावर रुसून बसतो, असं
नमूद केलं. आपण सर्वांनी निसर्ग प्रेमी, निसर्गाचे
रक्षक, संवर्धक बनलं पाहिजे, असं
ते म्हणाले.
महाविद्यालयात
नव्यानं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी, शिक्षण
घेतानाच नवनवीन गोष्टी शोधून काढण्याची नैसर्गिक उत्सुकता स्वत:मध्ये
कायम ठेवावी असा सल्ला दिला. रायबरेलीचे दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, योगेश
साहू आणि रजनीश वाजपेयी या तरुणांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून ‘स्मार्टगांव
अॅप’ तयार केलं असून, हे अॅप गावामध्ये एक प्रकारे डिजिटल
क्रांती घडवण्याचं काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
२३
जुलैला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांची जयंती
साजरी करण्यात आली, तर येत्या एक ऑगस्टला टिळकांची पुण्यतिथी आहे. पंतप्रधानांनी
या दोन्ही नेत्यांचं स्मरण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा
उल्लेख केला.
कवी
नीरज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी, नीरज
यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारी ठरू शकते, असं
सांगितलं.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही इको फ्रेंडली गणेशोत्सव
साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
२० वर्षांखालील कनिष्ठ ॲथलेटिक्स विश्वचषक स्पर्धेत
भारताच्या हिमा दासनं सुवर्ण पदक मिळवलं, तर विश्व पॅरा अॅथलेटिक्स ग्रॅंड प्रिक्स
२०१८ मध्ये एकतानं सुवर्ण आणि कांस्य पदकं, तर
सुंदर सिंह गुर्जर यांनी जॅवेलिनमध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी या खेळाडूंचं
अभिनंदन केलं.
****
रायगड
जिल्ह्यात महाडजवळ पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी
घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला,
यापैकी २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त गाडी हजार फुटापर्यंत
खाली गेली असून, दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत आहेत.
आज सकाळी ही मोहिम पुन्हा सुरू झाली. अपघातात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य
सरकारच्या वतीनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे, तर यात जखमी
झालेल्या प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा
देखील सरकारनं केली आहे.
****
देशाच्या
कानाकोपऱ्यातून आलेल्या कुलगुरूंनी शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत आणि सर्व विद्यापीठं
आणि विद्यापीठांशी संलग्न संस्थांना २०२० पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचं मानांकन
मिळवण्याबाबत पुन्हा एकदा निर्धार केला. नवी दिल्ली इथं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश
जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची तीन दिवसीय परिषद झाली, यात दहा सूत्रे
असलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. उच्च शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमात विविध
बाबींचा अंतर्भाव आणि संशोधनात सुधारणा इत्यादींचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे.
****
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस आज पाळण्यात येत आहे.
वाघांच्या संरक्षणाप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. यानिमित्तानं
मध्य प्रदेशच्या वन विभागाच्या टायगर फाऊंडेशन सोसायटीनं व्याघ्र संरक्षणा संदर्भात
जागरुकता आणि समर्थन मिळवण्यासाठी सहा शहरामंध्ये भित्तीचित्र स्पर्धेचं आयोजन केलं
आहे.
****
रशियन
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतपद पटकावलं आहे. आज झालेल्या
अंतिम फेरीत त्यानं जपानच्या कोकी वातानबे
याचा १८ - २१, २१ - १२, २१ - १७ असा
पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र रोहन
कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला
पराभव पत्करावा लागला.
****
तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनिया आणि संदीप तोमरनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बजरंगनं ७० किलो वजनी गटात तुर्कस्तानच्या मुस्तफा कायाचा १५ – चार असा पराभव केला,
तर तोमरनं बेलारुसच्या आंद्रेयूचा सात – चार असा पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment