Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 24 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा
समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची भूमिका असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे
कायदेशीर गुंतागुंत समजून घेऊन हा प्रश्न समन्वयानं सोडवला पाहिजे, असं महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलकांनी
चर्चेला यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय आता सरकारच्या अखत्यारीत
राहिलेला नाही, मागासवर्गीय आयोगानं अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय
देईल, मात्र हिंसक घटनांमुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, आंदोलनात घुसलेले
काही समाजकंटक शांततेत चाललेल्या या आंदोलनाला बदनाम करत आहेत असा आरोप पाटील यांनी
यावेळी केला.
****
दरम्यान,
मराठा आरक्षण आंदोलनात काल औरंगाबाद जिल्ह्यात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ
मराठा मोर्चा समन्वय समितीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यात दिसत
आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत असून काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं.
त्यामुळे औरंगाबाद शहरातली मोबाईलवरची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कायगाव टोका
इथं अग्निशमन दलाचं वाहन पेटवून देण्यात आलं, तसंच आंदोलकांनी औरंगाबाद-अहमदनगर महामार्ग
गेल्या चोवीस तासांपासून बंद केला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातल्या आणखी
दोन तरूणांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या दोघांना शासकीय रूग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांवर जमाव चालून आल्यानं पळताना पोलीस शिपाई
लक्ष्मण पाटगावकर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली.
परभणी
रेल्वे स्थानकावर आज आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केलं. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात
येत असून, बससेवा पूर्णपणे बंद आहे. सोनपेठ शहरात आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली.
हिंगोली
जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारची प्रतिकात्मक
प्रेतयात्रा काढली.
जालना
जिल्यातल्या घनसावंगी इथं आंदोलकांनी दगडफेक करत पोलिस व्हॅन पेटवून दिली. जमावानं
पोलिसांवर, घरांवर आणि तहसिल कार्यालयावर दगडफेक केली. घटनास्थळी राज्य राखीव दलाच्या
जवानांना पाचारण करण्यात आलं असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांची धरपकड सुरु
केली आहे.
अहमदनगर
जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. जामखेडमध्ये तीन तास रास्ता
रोको आंदोलन करण्यात आलं. राहाता शहरात मराठा मोर्चा काढण्यात आला, तर संगमनेर इथल्या
प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कोपरगाव, राहुरी, अकोले शहरात कडकडीत
बंद पाळण्यात आला. शेवगाव शहरात शेवगाव - नेवासा या एसटी बसवर संतप्त जमावानं दगडफेक
केली, तसंच टायर जाळले.
नाशिक
जिल्ह्यात मुंबई - आग्रा रस्त्यावर आडगाव जवळ एक तास रस्ता रोको करण्यात आला, यावेळी
वाहतूक ठप्प झाली होती.
लातूर,
बुलडाणा, वाशिम, जळगाव, सातारा जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला.
धुळे
शहर आणि जिल्ह्यात मात्र या बंदचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही. जिल्ह्यात सर्वत्र
शांतता असून कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
दरम्यान,
उद्या विविध मराठा संघटनांच्या वतीनं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक
जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे.
****
खरीप
हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार
आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांशी
संवाद साधून, कृषी विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना पिक विमा
योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले. स्थानिक
प्रशासकीय यंत्रणेनी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावं, तसंच बोंडअळीचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयानं
काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
पुणे
जिल्ह्यातल्या भीमा
कोरेगाव विजयस्तंभाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया
पोलिसांनी सुरु केली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर,
समाजकंटकांकडून विजयस्तंभाचं संरक्षण व्हावं या हेतूनं माहिती गोळा केली जात असल्याचं
वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हिमायतनगर नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे कुणाल राठोड दहा मतं मिळवून
विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांचा तीन मतांनी पराभव केला.
पीठासीन
अधिकारी महेश वडदकर यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment