Wednesday, 18 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 18 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या हंगामासाठी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये सरकारनं वाढ केली असून, आता हा दर दोन हजार ७५० रूपये प्रतिटन असा केला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीनं आज हा निर्णय घेतला. येत्या हंगामात उसाचं उत्पादन दहा टक्क्यांनी वाढून ते सुमारे पस्तीस दशलक्ष टन इतकं होण्याची अपेक्षा आहे.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सकाळी प्रारंभ झाला. आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला. या प्रस्तावावर येत्या शुक्रवारी चर्चा केली जाईल, असा निर्णय देत महाजन यांनी या प्रस्तावावर चर्चेसाठी सात तासांचा वेळही दिला. त्याच दिवशी या प्रस्तावावर मतदानही घेण्यात येणार आहे.

आंध्र प्रदेशच्या पाच आणि कर्नाटकच्या तीन लोकसभा सदस्यांनी दिलेले राजीनामे लोकसभा अध्यक्ष महाजन यांनी आज मंजूर केले, त्याचबरोबर चार नवीन सदस्यांना सदस्यात्वाची शपथ दिली.

महाराष्ट्रातले शेतकरी, दूध उत्पादक, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक अशा अनेक स्तरांवरचे लोक सतत आंदोलनं करत असून, सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. तर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही लोकसभेत शून्य काळात दूध आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करुन, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातली कोणतीही तरतूद कमकुवत होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत प्रश्नकाळात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना दिली. हा कायदा अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीनं सरकारनं २०१५ मध्ये यात काही दुरुस्ती केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं चिकलठाणा, हर्सुल सावंगी, पडेगाव या भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या कचरा समस्येवर आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. कचरा वर्गीकरण आणि कचरा व्यवस्थापन प्रकरणी, जनजागृती करणं आवश्यक असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातली समांतर जलवाहिनी, स्वच्छतागृह, रस्ते बांधणी, इत्यादी विकास कामांसंदर्भात कालबद्ध पाठपुरावा घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना देण्यात येतील, असं पाटील यांनी सांगितलं.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळण्यासाठीची उत्पन्न मर्यादा आजपासून सहा लाख रूपयांवरुन आठ लाख रुपयांपर्यंत केल्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत केली. तर, मुलांचं बालपण हिरावून घेतलं जाऊ नये, यासाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षांवरून पाच वर्षांवर आणता येणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोमवारपासून पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनात उद्या राज्यभरात जनावरांना सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. संघटनेच्या मागणीनुसार, दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याऐवजी सरकार गुजरातमधून मुंबईला दूध पुरवठा करत असल्यानं, सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नसल्याचा आरोप करत उद्या चक्का जाम करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या २७ हजार १५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणातला पाणीसाठा सध्या २२ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचं, जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी औसा तालुक्यातल्या संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची लवकरात लवकर निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.

****

No comments: