Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदानासह २५ रूपये प्रतिलिटर
भाव देण्याचा सरकारचा निर्णय
·
महाभरतीमध्ये
सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव - मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
ज्येष्ठ कवी - गीतकार नीरज यांचं निधन
आणि
·
औरंगाबाद शहरातल्या कचरा प्रश्नी शिवसेनेची आक्रमक
भूमिका
****
दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदानासह
२५ रूपये प्रतिलिटर भाव देण्याचा निर्णय दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी
काल विधानसभेत घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दूध उत्पादकांनी गेल्या चार
दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विरोधी
पक्षनेत्यांच्या काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला. या निर्णयानुसार
आता दूध संघांना, शेतकऱ्यांच्या दुधाला २५ रुपये प्रति लिटरपेक्षा कमी दर देता येणार
नाही. पाच रूपये प्रतिलिटर अनुदानाची रक्कम दूध उत्पादकांच्या थेट खात्यात जमा न करता
दूध संघांमार्फत दिली जाणार आहे.
राज्यातल्या सहकारी आणि खासगी दूध संघांनी
उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधासाठी हे अनुदान लागू असणार नाही. दूध भुकटी उत्पादकांना
या अनुदानाचा लाभ घेता येईल मात्र, त्यांना दूध भुकटी निर्यातीच्या अनुदानाचा लाभ घेता
येणार नाही, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.
****
या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात
पुकारलेलं दूधबंद आंदोलन मागे घेतलं आहे. त्यापूर्वी काल मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह अनेक ठिकाणी झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे ठिकठिकाणची वाहतुक विस्कळीत झाली होती.
****
शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये
सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील, आणि
न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात
येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधानपरिषदेत केली. बीड जिल्ह्यात परळी इथं, मराठा
समाजानं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे आणि
आमदार विनायक मेटे यांनी,
मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार,
न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत असल्याचं स्पष्ट केलं.
मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेसाठी विरोधी पक्षांकडून काल विधानसभेत
स्थगन प्रस्ताव देण्यात आला. सदनाची सर्व चर्चा थांबवून या प्रकरणी चर्चा करण्याची
मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित
पवार, यांच्यासह अनेक सदस्यांनी केली. महसूल
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शिक्षण, उद्योगासह
प्रत्येक क्षेत्रात सरकार मराठा समाजाला मदत करत असल्याचं सांगितलं.
****
माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं
सरकार आवश्यक पावलं उचलत असून माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही, अशी
ग्वाही कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी काल
विधानपरिषदेत दिली. माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सरकारकडून अद्यापही
पूर्ण झाल्या नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी उपस्थित
केला होता.
****
खासगी रुग्णालयातल्या परिचारिकांच्या वेतनासाठी किमान
वेतन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असं आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी
विधान परिषदेत सांगितलं. सदस्य नागोराव गाणार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
****
मालमोटार वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
गृह मंत्रालयानं संप संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूक करणाऱ्या वाहनातून मालवाहतूक
करण्यास परवानगी दिली आहे. काल यासंदर्भातले आदेश जारी करण्यात आले. मालवाहतूकदारांनी
आजपासून संपाचा इशारा दिला आहे.
****
केंद्र सरकारविरोधात दाखल अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत
चर्चा होणार आहे. लोकसभाअध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या चर्चेसाठी सात तासांचा वेळ
निश्चित केला आहे. चर्चेनंतर आजच या प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे.
****
ज्येष्ठ कवी - गीतकार गोपालदास सक्सेना उर्फ नीरज यांचं
काल वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून फुफ्पुसांच्या
संसर्गामुळे आजारी असल्यानं, त्यांच्यावर दिल्लीत भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स
मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल त्यांचं निधन झालं.
हिंदी आणि उर्दू भाषेतल्या अनेक उत्तम रचनांसाठी लोकप्रिय
असलेले नीरज यांनी, ‘जीना यहां मरना यहां’,‘ए भाय,जरा देख के चलो’ अशी लोकप्रिय चित्रपट
गीतंही लिहिली, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी चित्रपटांसाठी गीतलेखन थांबवलं
होतं. नीरज यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण सह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
औरंगाबाद शहरातला कचरा प्रश्न गंभीर होत असून, यामुळे
शहर बकाल होत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली
आहे. ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून, औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएम
मुळे जिंकत असल्याचा आरोप करत, ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असून, एखाद्या
उमेदवाराला शून्य मतं कशी काय पडू शकतात, असा प्रश्नही त्यांनी
यावेळी उपस्थित केला.
****
दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या कचरा प्रश्नी शिवसेनेनं आक्रमक
भूमिका घेत, काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन ट्रक कचरा टाकून, सरकारचा
निषेध केला. शहरात पाच महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचराकोंडी प्रकरणी
महापालिका बरखास्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, त्याचा
निषेध करत, कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याबाबतचं निवेदन
शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
दरम्यान,
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या
घटनेचा निषेध करत हा कचरा
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजासमोर टाकल्याचं सांगत, या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले.
रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
****
औरंगाबाद इथल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या
माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये भाडे तत्वांवर दिलेल्या गाळ्यांचे दर उद्योजकांना परवडतील
असेच आकारले जातील अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आमदार सतीश चव्हाण
यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा करतांना देसाई विधान परिषदेत बोलत होते. यासंदर्भात
येत्या दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही देसाई यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पासाठी
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या नाहीत मात्र त्यांच्या शेतजमिनीतही पाणी
साचलं आहे, अशा शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री
विजय शिवतारे यांनी विधान परिषदेत दिली.आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित
प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
****
कृष्णा खोऱ्याच्या सुधारीत जल आराखड्यामध्ये कृष्णा मराठवाडा
सिंचन प्रकल्पासाठी एकूण २३ अब्ज घनफुट पाणी वापराची तरतूद करावी अशी मागणी आमदार सुजितसिंह
ठाकूर यांनी काल विधान परिषदेत केली.हा प्रकल्प मराठवाड्यातल्या कायम दुष्काळी भागासाठी
महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं ठाकूर यांनी यावेळी नमूद केलं.
****
अहमदनगर जिल्हाधिकारी
कार्यालयातल्या पुरवठा विभागात दोन लाख रुपयांची लाच घेतांना पुरवठा निरीक्षक
नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहाथ पकडलं.
भिंगार इथल्या एका स्वस्त धान्य दुकानाविरूद्धची कारवाई टाळण्यासाठी गर्जे यानं
दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज ऑफलाईन पध्दतीनं
स्वीकारण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिवसेना
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं काल याबाबतचं
निवदेन बँकेच्या अध्यक्षांना सादर केलं.
****
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिल्या
जाणाऱ्या अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचं वितरण, येत्या बुधवारी होणार
आहे. पुरस्काराचं हे रौप्य महोत्सवी वर्षे आहे़
****
राज्यात २३ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा
आणि मध्य-महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं
आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान
तज्ज्ञांनी दिले आहेत.
दरम्यान,
नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबल्यानं, पैठणच्या जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक मंदावली
आहे. सध्या धरणात नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणीसाठा
जवळपास २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
गुजरातमध्ये कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वे रूळ वाहून
गेल्यामुळे, १७ जुलै रोजी ओखा - रामेश्वरम
एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती, परिणामी आज रामेश्वरमहून ओखाला जाणारी गाडीही
रद्द करण्यात आली आहे. ही गाडी उद्या मुदखेड, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड
मार्गे धावणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयानं कळवलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment