Tuesday, 24 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २४ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



v मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; कायगाव टोका इथं युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू; मराठवाड्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको; वाहनांवर दगडफेक

v सामाजिक प्रसार माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट

v आकाशवाणी पुणे केंद्राच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांचं निधन

v यंदाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार यंदा डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर

 आणि

v आषाढी एकादशी सर्वत्र भक्तिभावानं साजरी

****



 मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी साठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. मराठा मोर्चा समन्वय समितीच्यावतीनं औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात कायगाव टोका इथं औरंगाबाद अहमदनगर रस्त्यावर, गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलना दरम्यान, औरंगाबाद युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष माने यांचे वाहन चालक काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीपात्रात उडी मारली. बचाव पथकानं त्याला पाण्याबाहेर काढून इस्पितळात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटने नंतर अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक आंदोलकांनी रात्री उशिरा पर्यंत रोखून धरली होती. या दरम्यान, अहमदनगर कडून औरंगाबादकडे येणारी वाहतूक पैठण मार्गे वळवण्यात आली.



 गंगापूर पोलिस ठाणे परिसरातही आंदोलकांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चे नंतर आंदोलकांनी या युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याच्या पार्थिव देहावर आज सकाळी आंदोलन स्थळीच अंत्यसंस्कार करणार असल्याचं वृत्त आहे.



 या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आवाहन संघटनेनं केलं असून, शासकीय नोकरी मध्ये जाहीर केलेला १६ टक्के राखीव जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा आणि येत्या दोन दिवसात आरक्षणा विषयी मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

****

 या आंदोलनात परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं काल एक एसटी बस जाळण्यात आली, तर चार एसटी बस आणि चार खाजगी वाहनांवर दगड फेक करण्यात आली, तसंच रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



 जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या किनगाव इथं काल आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यामुळे काही वेळ तणा निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा या मागणीचं निवेदन स्थानिक मराठा समाजाच्या वतीनं अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना देण्यात आलं. उस्मानाबाद इथंही सोलापूर - औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको तर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

****



 देशभरात होत असलेल्या जमावा कडून मारहाणीच्या घटना घडू नयेत यासाठी शिफारसी करण्याकरता केंद्र सरकारनं केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनं काल ही माहिती दिली. चार आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनं सांगितलं. या शिवाय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वा खाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला असून हा गट उच्चस्तरीय समितीनं केलेल्या शिफारशींवर विचार विनिमय करू. जमावा कडून होणारी मारहाण हा दंडनीय गुन्हा मानण्यासाठी भारतीय दंड विधानात सुधारणा करण्याचा सरकारचा विचार असल्याचं, या अधिकाऱ्यांनं सांगितलं.

****



 १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजने संदर्भात अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये या संदर्भात प्रकरणं प्रलंबित असून, ती निकाली निघताच, वेतन वाढीचा निर्णय घेण्यात येईल, असं श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात या बाबत प्रश्न विचारला होता. नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांनीही, या योजने अंतर्गत मिळणारं निवृत्ती वेतन सर्वसामान्य कामगाराच्या वेतनापेक्षाही कमी असून, ते लवकरात लवकर वाढवण्याची मागणी केली.



 राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी, खासदार धनंजमहाडिक यांनी काल लोकसभेत केली.

****



 राज्यसभेत काल कामकाज सुरु होताच तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्य काळ पुकारल्यानंतरही सदस्यांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं, कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं.



तेलगु देसम पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेरही फलक झळकावत आंदोलन केलं. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं या खासदारांनी सांगितलं.  

****

सामाजिक प्रसार माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी काल राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्य नियंत्रित करण्याचा सरकारचा विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारचे धोरणं आणि कार्यक्रमांची महिती देणारं सामाजिक प्रसार माध्यामांचं केंद्र सुरू करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 आकाशवाणी पुणे केंद्राच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांचं परवा रविवारी हदयविकाराच्या झटक्यानं पुण्यात निधन झालं, त्या ८८ वर्षांच्या होत्या. जवळपास एक दशकाहून अधिक काळ त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रा वरून वृत्तनिवेदन केलं. त्यांनी अनेक लघुकथांचं लेखन केलं असून राज्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात औंधनजिक बोपोडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 मराठवाड्यातून अनेक मुख्यमंत्री झाले तरी या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. ठाकरे यांनी यावेळी भाजप नेते आणि राज्य शासनावर टीका करत, महाराष्ट्रापासून विदर्भ कदापीही वेगळा होऊ देणार नसल्याचा पुनरूच्चार केला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मराठवाड्याचा दौरा आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं.



 राज्य शासनाच्यावतीनं संत साहित्याचा प्रसार तसंच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार यंदा डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 आषाढी एकादशी काल राज्यभर विविध कार्यक्रम आणि भक्तीभावानं साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी काल पहाटे श्री विट्ठ-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा केली. बळीराजा सुखी होऊ दे, सकल जनांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना विट्ठलाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



पंढरपूर इथं श्री विट्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीनं दिले जाणारे निर्मल दिंडी हरित वारी पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. एक लाख रुपयांचा पहिला पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या शेडगे दिंडीला तर ७५ हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला देण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या अहिल्या देवी होळकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रती पंढरपूर इथल्या विठ्ठल - रूक्मिणी मंदीरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक महापूजा केली. जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या हजारो भाविकांनी पायी चालत येत विट्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतलं. यानिमित्त विविध शाळांनी दिंडी काढून वृक्ष लागवडीचा संदेश दिला, पैठण इथंही भाविकांनी गोदावरी नदीमध्ये स्नान करुन नाथ समाधीचं दर्शन घेतलं.



 परभणी जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये तसंच बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराज मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

****



 जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पक्षाच्या वतीनं काल सायकल मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल, डिझेलचे दर कमी कमी करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****



 सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयानं मंजूर केला आहे. या मार्गामुळे तुळजापूर इथं येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णया बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

*****

*** 

No comments: