Monday, 23 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी आज पहाटे श्री विट्ठ-रुक्मिणीची महापूजा केली. बळीराजा सुखी होऊ दे, सकल जनांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना विट्ठलाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंढरपूरला विट्ठल रुक्मिणी मंदिरात हिंगोलीचे वारकरी दाम्पत्य अनिल आणि वर्षा जाधव यांना महापूजेचा मान मिळाला.

****



 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीनं दिले जाणारे  निर्मल दिंडी हरित वारी पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. एक लाख  रुपयांचा पहिला पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या शेडगे दिंडीला तर ७५ हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला देण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या अहिल्या देवी होळकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

****

 जालना शहराचं ग्रामदैवत श्री आनंदीस्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली. नगरप्रदक्षणा घालून ही पालखी सायंकाळी पुन्हा मंदिरात परतेल. आषाढी एकादशी निमित आनंदी स्वामी महाराज मंदिरात सुरु असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा आज समारोप होईल. जिल्यातील हजारो भाविक पालखी दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

****



 अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदरा धरणं भरलं असून या धरणातून १० हजार ५१५ घनफूट प्रतिसेकंद पाणी प्रवरा नदीमध्ये सोडलं जात आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत १६ हजार २३१ घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडलं जात आहे.



 पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात सुमारे सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.

****



 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या वर्षी राबवण्यात येणार असून, या योजनेसाठी नांदेड जिल्ह्याला ४९० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातले अर्ज येत्या ७ ऑगस्ट पर्यंत संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचे आहेत.

*****

***

No comments: