Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 23 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे
मंत्रालयानं मंजूर केला आहे. या मार्गामुळे उस्मानाबाद आणि सोलापूरच्या विकासाला चालना
मिळण्यासोबतच तुळजापूर इथं येणाऱ्या
भाविकांची मोठी सोय होणार आहे. या महत्त्वपूर्ण
निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या
यंदाच्या २०१८-१९ च्या नियोजनात नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला असून, या
८० किलोमीटर मार्गाच्या उभारणीसाठी ९५३ कोटींचा
खर्च अपेक्षित आहे.
****
राज्यभर आज आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनी भक्तीभावानं
साजरी करण्यात आली.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या प्रती पंढरपूर इथल्या विठ्ठल - रूक्मिणी मंदीरात लाखो भाविकांनी दर्शन
घेतलं. या ठिकाणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक महापूजा केली. जिल्ह्यातल्या
विविध ठिकाणच्या भक्तांनी पायी चालत येत विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतलं. यानिमित्त विविध शाळांनी दिंडी काढून वृक्ष लागवडीचा संदेश दिला, तसंच जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. पैठण इथंही भाविकांनी गोदावरी नदीमध्ये पवित्र स्नान
करत नाथ
समाधीचं दर्शन घेतलं.
परभणी
जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं संत गजानन महाराज मंदीरात
दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
****
मराठा
समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा मोर्चा समन्वय समितीतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोका इथं गोदावरी नदी पात्रावर असलेल्या जुन्या पुलावर
आज ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान,
या ठिकाणी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष माने यांच्या वाहन चालकानं आत्महत्या केल्यामुळे
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षानं दिली आहे.
या
आंदोलनात परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं आज एक बस जाळण्यात आली, तर चार बस आणि चार
ट्रॅव्हल्सवर दगडफेक करण्यात आली, तसंच रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. यामुळे या
भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जालना
जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या किनगाव इंथ आज ५० मराठा तरुणांनी गावातल्या पाण्याच्या
टाकीवर चढून आंदोलन केलं. यामुळे काही वेळ तणाव निर्माण
झाला होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा या मागणीचं निवेदन स्थानिक
मराठा समाजाच्या वतीनं अंबड ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना देण्यात
आलं.
धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला आज शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलतांना माजी आमदार शरद पाटील यांनी, भाजप सरकारवर कठोर शब्दात टीका केली.
दरम्यान, या आंदोलनाची धग आता कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली
असून, मराठा क्रांती संघटनेनं येत्या नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
****
राज्य शासनाच्यावतीनं संत साहित्यासाठी तसंच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा
ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार यंदा डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून, गेली
५७ वर्षापासून अनेक मासिकांमधून तसंच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्.मयावर
लेखन करत आहेत. पाच लाख रुपये रोख, मानपत्र
आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
मराठवाड्यातून
अनेक मुख्यमंत्री झाले तरी या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. ठाकरे यांनी यावेळी
भाजप नेते आणि राज्य शासनावर टीका करून महाराष्ट्रापासून विदर्भ कदापीही वेगळा होऊ
देणार नसल्याचा पुनरूच्चार केला. आगामी
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा दौरा असल्याचंही त्यांनी
सांगितलं.
****
जालना
जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पक्षाच्या वतीनं आज सायकल मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल, डिझेलचे दर कमी कमी करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी
काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग
घेतला.
****
विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. येत्या दोन दिवसात कोकण, विदर्भ आणि उत्तर
मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक
ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे.
//**********//
No comments:
Post a Comment