Sunday, 29 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्यानं काम करत असून, आंदोलनादरम्यान हिंसा न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आज मराठा आंदोलकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. खासदार नारायण राणे या बैठकीला उपस्थित होते. पोलिसांवर थेट हल्ला किंवा तत्सम प्रकारचे गुन्हे करणारे आंदोलक वगळता, इतरांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या महाभरतीतही मराठा तरुणांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

****

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर इथं आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापुढचं आंदोलन राज्यभर एकसंघपणे राबवलं जाणार असल्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत असून, या आंदोलनात झालेल्या मृत्यूंना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं उद्यापासून मुंडण आंदोलनाला सुरुवात होत असून, एक ऑगस्ट पासून बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून विस्कळीत झालेलं जनजीवन आज पूर्वपदावर येत असलं, तरीही तणाव कायम आहे. सहा दिवसांपासून जिल्ह्यातली बससेवाही ठप्प आहे. जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या ईरळद इथं आज दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन, तर पूर्णा तालुक्यातल्या पिंपळा भत्या आणि पाथरी तालुक्यातल्या बाभळगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी आज परभणी इथं आंदोलनाचा आढावा घेतला, तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांचीही भेट घेतली.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी रस्त्यावर रबरी टायर पेटवून दिल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जाफराबाद तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथले तरूण शेतकरी कचरू दिगंबर कल्याणे यांनी आज आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीत आपण जाणार नसल्याची माहिती, बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.  

****

रायगड जिल्ह्यात काल एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातले सर्वच्या सर्व ३० मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सुमारे ३१ कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना काल सकाळी हा अपघात झाला. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला.

****

शुध्द आणि भेसळरहीत अन्न मिळणं हा सामान्यांचा अधिकार असून, अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून दिले पाहिजेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाची प्रयोगशाळा, तसंच इमारतीचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं जनतेला वेळेत आणि ऑनलाईन सेवा द्याव्यात, असं ते म्हणाले.

****

तस्करी विरोधी विधेयक व्यापक आणि पीडित केंद्रित असून, या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यावर संघटित गुन्हेगारीला आळा बसेल, असं नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मानवी तस्करी विरोधी विधेयक लोकसभेत पारित झालं असून, राज्यसभेत चर्चेला येणार आहे. देशाला अशा कायद्यांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं हिरो फायनान्स कंपनीला, अर्जदाराला नुकसान भरपाईपोटी ४० हजार ६०० रुपये परत करण्याचा आदेश दिला. दुचाकीच्या कर्जाच्या परतफेडीची नोंद न घेता कंपनीनं दुचाकी जप्त केल्याची तक्रार अर्जदारानं केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

लंडनमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामना सुरू होईल. बाद फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावा किंवा बरोबरीत सोडवावा लागेल.

****

No comments: