Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा आरक्षण आंदोलन राज्याच्या विविध भागात सुरूच असून,
या मुद्यावर भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या
प्रमुख राजकीय पक्षांनी आज बैठका घेतल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी काँग्रेस कार्यालयात, तर विधान परिषदेतले विरोधी पक्ष
नेते धनंजय मुंडे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली.
दोन्ही पक्षांचं शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्ग आयोगाची आणि राज्यपाल
सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.
****
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला
तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत
आज पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि
मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भातला सर्वसमावेशक अहवाल सर्वानुमते
केंद्राकडे पाठवावा, असं सांगून ठाकरे यांनी, मराठा समाजानं आंदोलनादरम्यान कोणताही
हिंसाचार न करण्याचं आवाहन केलं.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर
सरकारनं लगेच अध्यादेश काढावा, आणि कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर
करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद
इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारच्या पद भरतीतल्या मराठा तरुणांच्या
जागा तात्काळ भराव्यात किंवा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी,
अशी मागणी करत पाटील यांनी, आंदोलकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी
भागातल्या तरुणानं काल रात्री आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर, जालन्याहून औरंगाबादला
येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेस काही काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या.
नाशिक इथं शिवसेनेचे देवळाली विधानसभेचे आमदार योगेश घोलप
यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर नांदेड जिल्ह्यात नांदेड - लातूर मार्गावर
सोनखेड इथं आंदोलकांनी बसवर दगडफेक केली.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं काही समाजकंटकांनी दगडफेक
केली, मात्र गुन्हे मराठा आंदोलकांवर नोंदवण्यात आले असून, येत्या आठ ऑगस्ट पर्यंत
गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. एक
ऑगस्ट पासून जालना शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या
आंदोलन करण्यात येणार असून, आठ ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर
आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत
जी पात्र प्रकरणं सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली, ती
तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुंबई इथं आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू
महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेसंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या शैक्षणिक वर्षांत शैक्षणिक संस्थांना महाडीबीटी पोर्टलद्वारे
राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब लागत असला, तरी
संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
****
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानाला प्रतिसाद देत राज्य
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढकारातून लातूर जिल्ह्यातल्या लोदगा
इथं एकावन्न हजार बांबूंची लागवड केली जाणार आहे. उद्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.
****
मराठवाड्यात
जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार झालेल्या गावांसाठी शासनाच्या
वतीनं ‘सामुहिक मत्स्य शेती योजना’ राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त
डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री
तालुक्यातल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना भापकर यांच्या हस्ते
जलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. वृक्ष लागवडीचं उद्दीष्टही औरंगाबाद जिल्ह्यानं
पूर्ण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तुळजापूर नगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक
नारायण गवळी यांनी आज तुळजापूर इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ते ४७ वर्षांचे
होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष
आणि साकार मुद्रणालयाचे संस्थापक रामकृष्ण जोशी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पुष्पनगरी
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ८२ वर्षांचे
होते.
//**********//
No comments:
Post a Comment