आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि
उद्या उत्तरप्रदेशाची राजधानी लखनौच्या दौऱ्यावर
आहेत. नागरी विकास विभागाच्या विविध कार्यक्रमात ते आज सहभागी होणार
असून, ६० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं भूमीपूजन करणार आहेत. ‘नागरी
क्षेत्रांचं परिवर्तन’ या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असून, यावेळी
प्रधानमंत्री आवास योजना, नागरी क्षेत्र परिवर्तन नवीकरण अटल योजना आणि स्मार्ट
सिटी या योजनांचा तिसरा वर्धापनदिन साजरा होणार आहे.
****
हरवलेल्या व्यक्तींच्या तपासात आधार कार्डाच्या बायोमेट्रिक
माहितीचा वापर केला जाण्याचे निर्देश द्यावेत, या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात
दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर, न्यायालयानं केंद्र सरकारचा प्रतिवाद मागवला आहे.
हरवलेल्या व्यक्तींमध्ये असलेली लहान मुलं, वयस्कर आणि मनोरुग्ण यांचा शोध घेता यावा,
यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरची पुढची सुनावणी १३ नोव्हेंबरला होणार
आहे.
****
गेल्या वीस जुलै पासून सुरू असलेला मालवाहतूकदारांचा
संप काल मागे घेण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मालवाहतूकदारांच्या
संघटनेनं संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. वाहतुकदारांच्या ई वे बिल आणि विम्यासह
इतर समस्या सोडवण्यासाठी उचस्तरीय समिती स्थापन करण्याचं आश्वासन सरकारनं या चर्चेवेळी
दिलं. नव्वद लाख मालवाहतूकदार या संपात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या पिंपळगाव
इथले प्रल्हादराव कल्याणकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आत्महत्या
करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नांदेड इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शेतकऱ्यांना विविध कर्जांबाबत माहिती देण्यासाठी
महाराष्ट्र बँकेच्या वतीनं आज राज्यभरात कर्जमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्यात बँकेच्या २६ शाखांमधून मेळावे आयोजित केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे
अधिकारी प्रदीप कुतवळ यांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment