Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात हिंगोलीच्या वारकरी दाम्पत्याकडून
विठ्ठलाची महापूजा
v मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला न जाण्याचा
मुख्यमंत्र्यांचा निर्णय
v मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची विधानं दिशाभूल करणारी
- राज ठाकरे यांची टीका
v औरंगाबाद इथं ‘सुपर
स्पेशालिटी रुग्णालय’ स्थापन
करण्याची घोषणा
आणि
v आशियाई
कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा तसंच कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला
सुवर्ण पदक
****
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर मध्ये लाखो वारकऱ्यांची
मांदियाळी झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज,
संत गजानन महाराज तसंच संत सखाराम महाराजांच्या पालख्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून
तसंच परराज्यातूनही असंख्य दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. अवघं पंढरपूर विठू
नामानं दुमदुमून गेलं आहे.
काल पहाटे पासूनचं वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान
करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या दर्शनरांगेत उभे असलेले हिंगोलीचे
वारकरी दाम्पत्य अनिल आणि वर्षा जाधव यांना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळाला. परिवहन
मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री
महादेव जानकर, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
मराठा समाजानं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर ऐवजी मुंबईत वर्षा या आपल्या शासकीय निवास
स्थानीच विठ्ठलाची महापूजा करणार असल्याचं, काल जाहीर केलं होतं. पंढरपुरात दाखल दहा
लाखांवर वारकऱ्यांना कोणताही धोका संभवू नये, विठ्ठलाची पूजा निर्विघ्न पार पडावी,
यासाठी यंदा पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतल्याचं, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, मागासवर्गीय
आयोगाच्या अहवाला शिवाय आरक्षणाचा निर्णय घेता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट
केलं.
दरम्यान, वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी
पंढरपूर परिसरात आंदोलन करणार नसल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. औरंगाबाद
इथं काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही
मिळालं, तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं
आहे. देशमुख काल पंढरपूरला जात असताना माचणूर इथं आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा
ताफा अडवला, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून,
आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, पंढरपूर, सोलापूर आणि मंगळवेढा इथं मराठा आरक्षणाच्या
मागणी साठी सुरू असलेल्या आंदोलनानं काल हिंसक वळण घेतलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळ
- एसटीच्या अनेक बसगाड्यांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे.
हिंगोली जिल्ह्यात नांदेड- हिंगोली महामार्गावर कळमनुरी
तालुक्यात डोंगरकडा इथं अज्ञातांनी एसटी बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. याच मार्गावर
चूंचा इथं काल रात्री वर्धा - पंढरपूर या एसटी बसवर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना
मुख्यमंत्री आरक्षणाबाबत करत असलेली विधानं दिशाभूल करणारी आहेत, अशी टीका महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होते. भारतीय जनता पक्षानं सत्तेत आल्यानंतर विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी
विविध उपक्रमांत वेळ घालवल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध व्हायला नको,
असं ठाकरे यांनी म्हटलं आहे़.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या दिवाळी पासून
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं
आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या निर्णयाचा राज्यातल्या
१९ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर २१ हजार ५३० कोटी
रुपयांचा भार पडणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांसाठी
बाल संगोपन रजा आणि पुरुष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व सुटी देण्याचाही सरकार
विचार करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. रोजच्या कामाच्या वेळेत पंधरा मिनिटांची
वाढ करून शनिवार, रविवार सुटी देत पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रस्तावावर सरकार
अभ्यास करत असल्याचंही ते म्हणाले.
****
देशात
अंमली पदार्थांच्या व्यसनाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कृती आराखडा तयार
करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेला दिले
आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान
संस्था- एम्सला याकरता सात सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे. नोबेल पुरस्कार सन्मानित कैलाश सत्यार्थी यांच्या
‘बचपन बचाव आंदोलन’ या संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं
दिलेल्या आदेशाचं पालन होत नसल्या बद्दल, ही जनहित याचिका दाखल झालेली आहे. शाळकरी मुलांमध्ये व्यसनांचं
प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्यासाठी देशव्यापी उपाययोजनेची गरज असल्याचं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
२०१९ च्या लोकसभा निवडणुकी
साठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असं पक्षाकडून
सांगण्यात आलं आहे. काल दिल्लीत पक्ष कार्यकारिणीच्या बैठकी नंतर हा निर्णय जाहीर करण्यात
आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथं ‘सुपर
स्पेशालिटी रुग्णालय’ सुरू करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार
चौबे यांनी सांगितलं आहे. चौबे औरंगाबाद दौऱ्यावर असून,
काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- घाटी
इथं आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून भरीव मदत करण्याचं आश्वासनही चौबे यांनी यावेळी दिलं.
****
अहमदनगर-सोलापूर महामार्गावर झालेल्या
अपघातात ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. अहमदनगर जिल्ह्याच्या
नेवासा तालुक्यातल्या खरवंडी इथले हे वारकरी पंढरपूरला जात असताना अहमदनगर-सोलापूर
रस्त्यावर पाटेवाडी गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ जीपला एका कंटेनरनं धडक दिल्यानं हा
अपघात झाला.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर
अकोले गावाजवळ क्रूझर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले.
यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. काल सकाळी हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या हट्टा गावा
पासून तीन किलोमीटर अंतरावर परभणीहून जवळा बाजारकडे येणाऱ्या टाटा आयशर गाडीचा टायर
फुटून झालेल्या अपघातात २ जण ठार तर १४ जण जखमी झाले. काल सकाळी सव्वा नऊवाजेच्या सुमारास
ही घटना घडली. आयशरचा टायर फुटल्यानं रोडच्या बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला त्यानं
धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
बीड इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय गोदामाला
आग लागून कापसाच्या गाठी भस्मसात झाल्या. काल पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन
दलाच्या ३ तासांच्या प्रयत्ना नंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत कापसाच्या सुमारे साडे
चार कोटी रुपये किमतीच्या, एक हजार ९३२ गाठी भस्मसात झाल्या.
****
इंडोनेशिया
मध्ये जकार्ता इथं झालेल्या आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं
सुवर्ण पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं इंडोनेशियाच्या कुनलावुत
वितिदसर्नचा २१- १९, २१ - १८ असा पराभव केला.
****
आशियाई कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद
स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीनं ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यानं
मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला पराभूत केलं. यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन
गिरी आणि नवीन हे स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे त्यांना रौप्य पदावर समाधान
मानावं लागलं.
*****
***
No comments:
Post a Comment