Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 22 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
आषाढी
एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्या आणि हजारो दिंड्या महिनाभर प्रवास
करुन आज पंढरपूर इथं पोहोचल्या आहेत.
****
दरम्यान,
पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा
रद्द करण्यात आली आहे. आज सकाळपासून पंढरपूर, सोलापूर आणि मंगळवेढा इथं मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
करण्यात आला आहे. आंदोलनामुळे पंढरपुरात दाखल झालेल्या दहा लाखांवर वारकऱ्यांच्या जीविताला
धोका असल्यामुळे पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकादशीच्या
दिवशी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, विठ्ठलाची पूजा
निर्विघ्न पार पडावी, अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं
हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित असून, वारकऱ्यांना वेठीस धरून अशा प्रकारच्या मागण्या
करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून,
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाशिवाय आरक्षणाचा निर्णय घेता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
स्पष्ट केलं.
****
पुढच्या
आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं, तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार
असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख आज पंढरपूरला जात असताना
माचणूर इथं आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.
सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून, आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
****
मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सकल मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून
विरोध करू नये, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे़.
ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षानं सत्तेत आल्यानंतर
विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी विविध उपक्रमांत वेळ घालवल्याची टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्री आरक्षणाबाबत करत असलेली
विधानं दिशाभूल करणारी असल्याचं ते म्हणाले़.
****
दरम्यान,
वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पंढरपूर परिसरात आंदोलन करणार नसल्याचा निर्णय
मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. औरंगाबाद इथं आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला.
****
औरंगाबादच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्याबरोबरच याठिकाणी लवकरच
अद्ययावत ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालय’ सुरू करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य
राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितलं. चौबे औरंगाबाद दौऱ्यावर असून, घाटी
इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
मराठवाड्याला
कर्जमाफीपोटी वीस हजार कोटी रूपये मिळाले असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं आज विधानसभा मतदारसंघातले
लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. निलंगा विधानसभा मतदार संघातल्या
शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध प्रकारच्या अनुदानातून ४०० कोटी रूपयांची रक्कम मिळाली
असल्याचं ते म्हणाले.
****
देशात
अंमली पदार्थांच्या व्यसनाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कृती आराखडा तयार
करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेला दिले
आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एम्सला याकरता सात सप्टेंबरपर्यंत
मुदत दिली आहे. नोबेल सन्मानित कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाव आंदोलन’ या संस्थेनं
दाखल केलेल्या याचिकेवर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन होत
नसल्याबद्दल जनहित याचिका दाखल झालेली आहे. विशेषतः शाळकरी मुलांमध्ये व्यसनांचं प्रमाण
वाढत असून, त्याला आळा घालण्यासाठी देशव्यापी उपाययोजनेची गरज असल्याचं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
इंडोनेशियामध्ये
जकार्ता इथं झालेल्या आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं सुवर्ण
पदक पटकावलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं इंडोनेशियाच्या कुनलावुत वितिदसर्नचा
२१- १९, २१ - १८ असा पराभव केला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात २५ पूर्णांक ५९ टक्के इतका पाणीसाठा झाला
आहे. नाथसागरात सध्या तीन हजार ७४७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
दरम्यान, मराठवाड्यात आज औरंगाबादसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं हजेरी
लावली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २९ जुलैला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment