आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
अहमदनगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारात कार
आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक १६ वर्षांचा
मुलगा जखमी झाला. आज पहाटे हा अपघात झाला. जखमी मुलाला जामखेड इथल्या रुग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे. मृत सर्वजण नेवासा तालुक्यातल्या खरवंडी इथले रहीवाशी आहेत. या अपघातामुळे
महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
राज्याबाहेरून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षा
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात
आलेल्या नीट-२०१८ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामार्फत
उद्या देण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी दिनांक १३ जून
ते १७ जून या कालावधीत प्रवेश नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. या उमेदवारांच्या
याचिका प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या.
****
स्वच्छ भारताचं स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याची
खूप मोठी जबाबदारी तरुण पिढीवर असल्याचं मत स्वच्छता क्षेत्रातले राष्ट्रीय स्तरावरील
तज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिकच्या देवळाली इथं एका कार्यक्रमात
बोलत होते. तरुणांनी मनावर घेतलं तर आपल्या देशात संपूर्ण स्वच्छतेची अंमलबजावणी करुन
ती कायम ठेवणं शक्य होईल, असं ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर ७१ वर्ष उलटून सुद्धा आपण
स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर होऊ शकलो नाही, ही खूप मोठी शोकांतिका असल्याचं नावरेकर
म्हणाले.
****
अमृत योजनेच्या माध्यमातून परभणी शहराचा पाणीप्रश्न
प्राधान्यानं सोडवण्यात येईल, असं महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी म्हटलं आहे.
पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काल प्रथमच घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी ही
माहिती दिली. शहरात लवकरच डांबरी रस्ते, पथदिव्यांची उभारणी आणि वृक्षलागवड केली जाईल,
असं पवार यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणारतून ३ हजार ८७१ दश लक्ष घनफूट वेगानं
पाणी सोडण्यात येत आहे. या धरणारच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, धरण
९० टक्के भरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment