Thursday, 19 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 19.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 19 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील आणि न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली. बीड जिल्ह्यात परळी इथं आरक्षणासाठी मराठा समाजानं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, भाजपाचे विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार भक्कमपणे न्यायालयात आपली बाजू मांडत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही, अशी ग्वाही कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सरकारकडून अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला होता. माथाडी कामगारांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीनं, प्रत्येक माथाडी कामगारांना यापुढे स्वतंत्र ओळखपत्र दिलं जाईल, तसंच येत्या एक महिन्यात माथाडी कायद्यासंदर्भात संकेतस्थळ सुरू करणार असल्याचं, निलंगेकर यांनी सांगितलं. माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरं कुणालाही दिली जाणार नाहीत, तसंच त्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवले जातील असंही ते म्हणाले.

****

दूध दरवाढीसाठी दूध उत्पादकांनी पुकारलेल्या आंदोलनात आज राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावर ढोरेगाव इथं संघटनेचे गंगापूर तालुका अध्यक्ष संपत रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झालं. गंगापूरचे नायब तहसीलदार भालचंद्र तेजनकर यांना यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कोकपाटी इथंही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. हिंगोली आणि जालना जिल्ह्यातही हे आंदोलन केल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला.   

****

गेल्या वर्षभरापासून गायीच्या दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत असून, नऊ महिन्यात दूध उत्पादकांना सुमारे तीन हजार २०० कोटी रुपयांचा फटका बसल्याचं राज्य किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं ते आज वार्तहरांशी बोलत होते. शासनाला दूध पावडरची किंमत असून, उत्पादक शेतकऱ्यांची किंमत नसल्याचा आरोप त्यांनी योवळी केला. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे, अशी मागणी नवले यांनी केली.   

****

औरंगाबाद शहरातला कचरा प्रश्न गंभीर होत असून, यामुळे शहर बकाल होत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून, औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएममुळे जिंकत असल्याचा आरोप करत, ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असून, एखाद्या उमेदवाराला शून्य मतं कशी काय पडू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

****

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजासमोर आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकून जे आंदोलन केलं, या घटनेचा आपण प्रशासनाच्या वतीनं निषेध करत असल्याचं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. आंदोलनानंतर थोड्याच वेळात दोन जेसीबी मशीन्सच्या सहाय्यानं हा कचरा उचलण्यात आला.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज ऑफलाईन पध्दतीनं स्वीकारण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं आज याबाबतचं निवदेन बॅकेच्या अध्यक्षांना सादर केलं.

****

पश्चिम रेल्वेमधल्या राजकोट-ओखा सेक्शन मधल्या कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वे पटरी वाहून गेल्यामुळे १७ जुलै रोजी ओखा - रामेश्वरम एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती, त्यामुळे उद्या रामेश्वरमहून ओखाला जाणारी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. परिणामी ही गाडी रविवारी मुदखेड, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे जाणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...