Friday, 27 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 27 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. भाजपचे मंत्री आणि आमदारांच्या काल रात्री घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. सर्वपक्षीय बैठक विधानभवनात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करेल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, म्हणूनच याबाबत अध्यादेश काढला होता, मात्र न्यायालयानं सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली, त्यामुळे आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयापुढे ठेवून त्यावर लवकर निर्णय करण्याची विनंती केली जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

****

आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणावर तत्काळ विचार करण्यास तयार असल्याचं माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि मराठा नेत्यांशी चर्चा केल्याचं सांगून राणे यांनी, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सक्षम असल्याचं नमूद केलं. मात्र यासाठी आंदोलन न करता चर्चा करावी, तसंच मराठा संघटनांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आंदोलकांनी जास्त प्रमाणात हिंसा करु नये, जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचंच नुकसान होईल, असंही ते म्हणाले. 

****

राज्यात आजही अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे.

हिंगोली जिल्ह्यात हे आंदोलन आज अधिक तीव्र झालं असून, आंदोलकांनी आज नांदेड -हिंगोली रस्त्यावर दाते फाटा इथं ट्रक जाळले, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयात तोडफोड करुन आग लावली, तसंच आखाडा बाळापूर इथं अडीच तास रास्ता रोको आंदोलन केलं. इतरही मार्गावर झाडं तोडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि टायर जाळण्यात आले. आमदार रामराव वडकुते भाषणासाठी गेले असता, त्यांनाही आंदोलकांनी विरोध केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सोलापूर शहरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करत, या दोन्ही नेत्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहर आणि तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सुरु असलेलं बेमुदत ठिय्या आंदोलन आज सलग सातव्या दिवशीही सुरु आहे.

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी आज गोदावरी नदी पात्रात उतरुन आंदोलन केलं. तर काही महिलांनी बानेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकार विरोधात निषेध नोंदवला.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी विधानसभा अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाकडे राजीनामा पाठवला आहे. झनक यांच्यासह जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सुमारे ५० ते ६० पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लोकांना खोटी आश्वासनं देऊन परदेशात पाठवणाऱ्या अनधिकृत दलांलांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवी दिल्ली इथं आज प्रवासी भारतीयांच्या विवाह, महिला तसंच लहान मुलांची तस्करी यासंबंधीच्या राष्ट्रीय संमेलनात त्या बोलत होत्या. सरकारनं अधिकृत ठरवलेल्या दलांलामार्फतच परदेशात जावं, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

नवीन उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण संशोधनाचा अभाव, हे देशापुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज कुलगुरु आणि संचालकांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. गुणवत्ता आणि शिक्षणात सुधार ही आजच्या काळाची गरज असून, सर्व केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी, वातावरण निर्मितीची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाच्या क्षेत्रात भारताचं कौशल्य जगासमोर आणण्याची वेळ आली असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले. 

****

माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कलाम यांना आंदरांजली अर्पण केली आहे.  

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या शिंगावे आणि असली ग्रामपंचायतीत २०१५-१६ मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात एक कोटी ३८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन सरपंच, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह नऊ जणांविरुध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...