Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v मराठा आरक्षणाचा प्रश्न समन्वयानं सोडवण्याचं महसूल मंत्र्यांचं
आवाहन
v महाराष्ट्र बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण; जमावावर नियंत्रणासाठी
जालन्यात अश्रुधुरासह पॅलेटगन, पंपगनचा वापर
v खरीप हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला ३१
जुलैपर्यंत मुदतवाढ
आणि
v मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षांशी विचार विनीमय करूनचं मराठवाड्याचं
पॅकेज जाहीर करावं - निवृत्त सनदी
अधिकारी कृष्णा भोगे यांचं मत
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची भूमिका
असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कायदेशीर गुंतागुंत समजून घेऊन हा
प्रश्न समन्वयानं सोडवला पाहिजे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलकांनी चर्चेला यावं असं आवाहनही त्यांनी
केलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय आता सरकारच्या अखत्यारीत राहिलेला नाही, मागासवर्गीय
आयोगानं अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय देईल, मात्र हिंसक घटनांमुळे
मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, आंदोलनात घुसलेले काही समाजकंटक शांततेत चाललेल्या
या आंदोलनाला बदनाम करत आहेत असा आरोप पाटील यांनी यावेळी केला.
****
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणी साठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या पार्थिव देहावर काल कायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात, औरंगाबाद अहमदनगर मार्गावर, कायगाव टोका इथं, या तरुणाचा परवा आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला.
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे काल अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले असता, आंदोलकांनी खैरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जमावाच्या विरोधामुळे खैरे यांना परत जावं लागलं.
या आंदोलनात शिंदे यांचा
मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ मराठा मोर्चा समन्वय समितीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा
परिणाम काल मराठवाड्यात दिसून आला.
औरंगाबाद जिल्ह्यात
औरंगाबाद शहरासह पैठण, वैजापूर, सिल्लोड,
कन्नड आदी ठिकाणी बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं. त्यामुळे मोबाईलवरची
इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कायगाव टोका इथं अग्निशमन दलाचं वाहन पेटवून देण्यात
आलं, या दरम्यान प्रक्षुब्ध जमाव पोलिसांवर चालून आल्यानं पोलिस जमादार शाम काटगावकर यांचा
हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं
मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलनादरम्यान आणखी
दोन तरूणांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या दोघांना शासकीय रूग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर महामार्ग परवापासून
बंद होता, तो काल सुरु झाला.
जालना शहरात मुख्यमंत्र्यांसह आमदार,
खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन, राजूर,
मंठा, बदनापूर इथंही बंद पाळण्यात आला, घनसावंगी इथं आंदोलकांनी
दगडफेक करत पोलिसांची गाडी पेटवून दिली. जमावानं तहसील कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांवर
दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना
अश्रुधाराच्या २० नळकांड्या
फोडाव्या लागल्या.
तसंच पॅलेटगनसह
पंपगनचा वापर करावा लागला, प्रक्षुब्ध जमावानं, अग्निशमन
वाहनासह तीन
दुचाकी तसंच पोलिसांची
जीप पेटवून दिली.
जालन्याहून पाचारण केलेल्या राज्य
राखीव दलाच्या जवानांनी धरपकड सुरू केल्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी या प्रकरणी दहा संशयितांना ताब्यात घेतलं असून, तपास सुरू आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर
काल आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केलं. सोनपेठ शहरात आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी
फोडली.
हिंगोली रेल्वे स्टेशनवर रेल्वे अडवण्याच्या प्रयत्नात
असलेल्या तरुणांना ताब्यात घेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक झाली. आखाडा बाळापूर
इथं राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
काढून त्याचं दहन केलं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातल्या खानापूर चित्ता रोडवर आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. वसमतमध्येही
दगडफेकीच्या घटना घडल्या.
लातूर इथं दगडफेकीचे किरकोळ प्रकर वगळता बंद शांततेत
पार पडला. अमोल जगताप या तरुणानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करुन त्याला ताब्यात घेतलं. शहरातली बहुतांश शाळा महाविद्यालय
बंद ठेवण्यात आली होती.
उस्मानाबाद इथंही बस वाहतूक तसंच शैक्षणिक संस्था
काल बंद होत्या. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.
उस्मानाबाद -तुळजापूर रस्त्यावर टायर पेटवून दिल्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही
काळ विस्कळीत झाली होती.
नांदेड जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयं
बहुतांशी बंद होती. शहराबाहेर जाणाऱ्या एसटी बसेसही बंद होत्या. अनेक मार्गांवर आंदोलकांनी
टायर पेटवून देत वाहतुक बंद केली होती. नांदेड जिल्हा वकील संघानं महाराष्ट्र बंदला
पाठिंबा दिला होता.
बीड मध्यवर्ती बस स्थानकातून सुटणाऱ्या बसच्या ४६१
फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या. तर जिल्ह्यातली शाळा-महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली
होती.
अहमदनगर
जिल्ह्यातही शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. जामखेडमध्ये तीन तास रास्ता रोको आंदोलन
करण्यात आलं. राहाता इथं मोर्चा काढण्यात आला, तर संगमनेर इथल्या प्रांत कार्यालयावर
ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कोपरगाव, राहुरी, अकोले आदी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेवगाव इथं एसटी
बसवर जमावानं दगडफेक केली, तसंच टायर जाळले.
दरम्यान, विविध मराठा
संघटनांच्या वतीनं आज मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यात बंद
पाळण्यात येणार आहे.
****
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी
राज्यसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधत, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन,
हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत,
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा आरक्षण प्रकरणी औरंगाबाद
जिल्ह्यात झालेल्या युवकाच्या मृत्यूकडे काल लोकसभेचं लक्ष वेधलं.
****
इंधन दरवाढ, पथकर आणि विमा हप्ते वाढ या या विरोधात
देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेलं चक्का जाम आंदोलन काल पाचव्या दिवशीही सुरू होतं.
या संपामुळे भाजीपाला, धान्य, भुसार माल, खतांसह सिमेंटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत
आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेची
अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं.
काही महाविद्यालयांमध्ये १०० टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या
तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा संस्थांविरुध्द नियमानुसार तत्काळ कारवाई करण्यात
येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत केलेल्या
क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगानं केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे
अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत.
या आयोगानं केलेल्या शिफारशीनुसार मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि औरंगाबाद
इथं वसतीगृह, पाच ठिकाणी निवासी शाळा स्थापन करण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे
निर्देशही बडोले यांनी यावेळी दिले.
****
खरीप
हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत
वाढवण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी
काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांशी
संवाद साधून, कृषी विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी
पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले.
****
मराठवाडा विकास मंडळाच्या
अध्यक्षांशी विचार विनीमय करूनचं मराठवाड्याचं पॅकेज जाहीर करावं असं मत माजी विभागीय
आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केलं. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ
यांच्या जयंती निमित्त काल औरंगाबाद
इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत ‘मराठवाड्याचा विकास’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष हे जिल्हा नियोजन समितीचे
सह अध्यक्ष असावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत नगरपालिकेच्या
अध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचं अनुसूचित जाती प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं
निष्पन्न झालं आहे. जात पडताळणी समितीनं नुकतेच यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या
हिमायतनगर नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे कुणाल राठोड दहा मतं मिळवून विजयी झाले.
त्यांनी काँग्रेसचे अब्दुल अकील अब्दुल
हमीद यांचा तीन मतांनी पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव नगरपचांयतीच्या
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बहिरे तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या
कुसुम महाजन यांची काल बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाचा अडीच
वर्षाचा कालावधी संपल्यानं काल विशेष सभा घेण्यात आली. विशेष सभेला एकूण १७ पैकी १६
नगरसेवक उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातल्या अभिलेखापाल सिंधू वानखेडे या महिलेला दीडशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
रंगेहाथ पकडलं. तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या शेतजमीनीची
नक्कल देण्यासाठी वानखेडेनं ही लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment