Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२६ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात
पुकारलेलं आंदोलन आजही अनेक भागात सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड इथं पुणे इंदूर
महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. जालना औरंगाबाद मार्गावर बदनापूर
इथं चक्का जाम आंदोलन सुरु आहे. यामार्गावर अनेक वाहनांवर दगडफेक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी एकही बस धावली
नाही. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे प्रवाशांची
मोठी गैरसोय निर्माण झाली होती. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची पोलिसांकडून
धरपकड सुरु आहे.
दरम्यान, कळमनुरीचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची
चारचाकी गाडी काल रात्री हिंगोली इथं, अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. आग वेळीच विझवण्यात
आल्याने अनर्थ टळला, मात्र कारचं मोठं नुकसान झालं.
बुलडाणा जिल्ह्यातही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा
इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. काल बुलडाणा नजिक वायझडी धरणामध्ये
काही तरुणांनी पाण्यात उतरुन आंदोलन केलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन,
नंतर जामीनावर सुटका केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत
असून, अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडं तोडून, रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. जिल्ह्यात
बस वाहतुकही पूर्ण बंद असून, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबईत काल पुकारण्यात आलेल्या बंद
दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबईतली मोबाईल इंटरनेट
सेवा बंद करण्यात आली आहे. काही भागात आजही तणावपूर्ण वातावरण असल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास
तयार असल्याचं उत्तर लष्करी कमांडर लेफ्टनंट गनरल बलबीर सिंग यांनी म्हटलं आहे. कारगिल
विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू
काश्मीर मधल्या द्रास इथं युद्धस्मारका जवळ ते वार्ताहरांशी बोलत होते. सैनिकांचं संघर्ष
आणि योगदानाचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीर मधली परिस्थिती
यावर्षी नियंत्रणात असून, लष्कराचं कमीत कमी नुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना अभिवादन केलं
आहे. भारतीय जवानांनी शांतता भंग करणाऱ्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं, तसंच त्यांनी
देशाची सुरक्षा सुनिश्चित केली, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
नव्याने उभारला जाणारा दिल्ली मुंबई हरित महामार्ग
हा मागास भागातून जात असल्यानं, बांधकामाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली असल्याचं,
सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे, ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात बोलत होते. या महामार्गावर राजस्थानात अनेक ठिकाणी विमानं उतरू तसंच उड्डाण करू
शकतील, असं गडकरी यांनी सांगितलं. या योजने अंतर्गत राज्यात ९८० किलोमीटर लांबीच्या
रस्त्यांचं काम सुरू झालं असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. अकोल्याचे भाजप खासदार संजय
धोत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर
प्रदेश आणि झारखंडच्या सर्व जिल्ह्यांचं येत्या एक ते ३१ ऑगस्ट दरम्यान सर्वेक्षण होणार
आहे. यात स्वच्छतेचं प्रमाण, दर्जा या मानकांद्वारे जिल्ह्यांसह राज्यांचा गुणानुक्रम
ठरणार आहे. त्या नंतर येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी सर्वेक्षणात उत्तम ठरणाऱ्यांना
सन्मानित केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
व्यापारात
संतुलित वृद्धी करण्यासाठी किरकोळ व्यापार धोरण तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याचं
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू
यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या संदर्भात
आपण ग्राहक व्यवहार मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, असं
ते म्हणाले. किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देताना, सरकार लहान किरकोळ व्यापाऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढल्या आठ वर्षात देशाच्या
अर्थव्यवस्थेचं आकारमान दुप्पट होईल आणि २०३५
पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक
हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना आयर्लंड बरोबर
होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल. चार संघांच्या ‘ब’ गटात सध्या भारत तिसऱ्या स्थानावर
आहे. शनिवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतानं यजमान इंग्लंडला एक एक अशा बरोबरीत
रोखलं होत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६वा भाग असेल.
*****
***
No comments:
Post a Comment