Monday, 30 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 आसामची राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली झालं असून, याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. या पुस्तिकेत ४० लाख लोकांचं नागरिकत्व अवैध ठरवल्या बद्दल विरोधकांनी आज लोकसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ४० लाख लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न असून, याबाबत ठोस निर्णय घ्यावा, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. हा मानवाधिकाराचा मुद्दा असून, आसाममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. यावर बोलताना गृहमंत्र्यांनी, ही यादी नि:पक्षपातीपणे तयार करण्यात आली असून, ज्यांची नावं या यादीत नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याची आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं.



 राज्यसभेतही या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निवेदन देण्याची मागणी केली. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसना समोर हौद्यात उतरुन घोषणा बाजी केल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.   

****



 दरम्यान, आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेत एकूण तीन कोटी २९ लाख अर्जांमधून दोन कोटी ८९ लाख लोकांची नावं समाविष्ट करण्यात आली असून, ४० लाख लोकांची नावं यातून वगळण्यात आली आहेत. ही केवळ प्राथमिक यादी असून अंतिम अहवाल नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.

****



 एक पीक उत्पादन पद्धतीत बदल करून, एकाच वेळी विविध प्रकारच्या अन्नधान्य उत्पादनाची पद्धत अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. चेन्नई इथं स्वामीनाथन फाऊंडेशननं आयोजित केलेल्या, 'पोषण आहारक्षम कृषीव्यवस्था' या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. भरड धान्य, फळं आणि भाज्यांसोबतच, विविध प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन घेतल्यानं पोषणक्षम अन्नधान्य उत्पादनांतली समृद्धता वाढे, जमिनीचा कस कायम राहिल, तसंच डाळींच्या आयातीवरचा भारही कमी करता ये, असं नायडू यांनी सांगितलं.

****



जम्मू-काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्याच्या नायरा ताहब परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळी बारात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला. काल रात्री झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणी साठी राज्यात आजही काही ठिकाणी आंदोलन सुरु आहे. सोलापूर शहर आणि परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून, बंदला हिंसक वळण लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंदोलकांनी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची तोडफोड केली, यावेळी प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या परिसरात पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री सुरु आहे. शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद आहेत. अक्कलकोट, चुंगी इथंही सर्वत्र बंद असून, आंदोलन सुरु आहे. हिंगोली - नांदेड रस्त्यावर माळेगाव फाटा इथं रस्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या एका युवकानं काल रात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. प्रमोद पाटील असं या युवकांचं नाव आहे. काल दुपारी त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर संदेश लिहून आत्महत्या करणार असल्याचे, संकेत दिले होते. प्रमोद यांचा मृतदेह औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात असून, आरक्षणा बाबत ठोस निर्णय झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा मोर्चा आंदोलकांनी औरंगाबाद - जालना महामार्ग रोखला असून, सरकार विरोधात घोषणा बाजी सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद जिल्ह्यातली ही तिसरी आत्महत्या आहे.

****



 महाड जवळ पोलादपूर इथं बस दुर्घटनेत मरण पावलेल्या दापोली कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांत सामावून घेणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली आहे. मरण पावलेल्या ३० कर्मचाऱ्यांपैकी २३ जण विद्यापीठाचे कायमस्वरुपी कर्मचारी होते, इतर सात जणांबाबतही विशेष बाब म्हणून त्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत सामावून घेतलं जाईल, अशी माहिती वायकर यांनी दिली.

****



 औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

*****

***

No comments: