आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी
परीषदेची बैठक आज नवी दिल्लीत प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली
होणार आहे. परिषदेची ही २८ वी बैठक असून यावेळी काही वस्तूंवरच्या करात कपात करून सुसूत्रता
आणण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सॅनिटरी नॅपकीन, हस्तकला
आणि हातमाग वस्तु या वस्तूंचा यात समावेश असण्याची शक्यता आहे.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था - आय आय टी सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये
मुलींचं प्रमाण कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आयआयटी खडगपूर इथं काल आयोजित
करण्यात आलेल्या ६४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. गेल्या वर्षी एक लाख ६० हजार
विद्यार्थ्यांनी आयआयटीसाठी प्रवेश परीक्षा दिली होती, त्यात केवळ ३० हजार मुलींचा
सहभाग होता, तर १० हजार ९०० विद्यार्थ्यांनी आयआयटीसाठी प्रवेश घेतला. यात केवळ ९९५
मुली होत्या. यात बदल होण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाले.
****
इंधन दरवाढ तसंच टोलच्या विरोधात माल वाहतुकदारांनी
चक्का जाम आंदोलन सुरू केल्यानं नाशिक जिल्ह्यातले १२ हजार ट्रक बंद झाले आहेत. त्याचा
परिणाम म्हणून लासलगाव इथला कांदा लिलाव आज होऊ शकणार नाहीत. हा संप असाच सुरू राहीला,
तर सोमवार नंतर कांद्याच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असं बाजार समितीच्या
सूत्रांनी सांगितलं.
****
परभणी महानगर पालिकेच्या वतीनं शहरात काल प्लास्टीक
पिशवी बंदी मोहीम राबवण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत २५ हजार रुपयांचा
दंड वसूल करण्यात आला. यावेळी उपायुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातल्या नागरीकांना
कॅरिबॅगचा वापर न करण्याचं आवाहन केलं, असं केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही
त्यांनी दिला.
****
मातंग समाजाच्या विविध मागण्यासांठी काल जालना इथं
आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मातंग आरक्षणाची मागणी मंजूर करून अनुसूचित जातीच्या १३
टक्के आरक्षणाची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी, यासह अनेक मागण्यांचं निवेदन तहसीलदार
विपिन पाटील यांना देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment