Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø
फौजदारी
कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर
Ø आरक्षणासंदर्भात
राज्यपालांनी हस्तक्षेप करून, सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, -विरोधी पक्षांची मागणी
Ø मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आज सायंकाळपर्यंत जाहीर
केल्यास आंदोलन मागे घेण्याचे संकेत
Ø मराठा आरक्षणाला
पाठिंबा दर्शवत आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा
आणि
Ø राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत औरंगाबाद विभागासाठी एक
हजार २१४ योजना प्रस्तावित
****
१२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर
लैंगिक अत्याचार प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेलं आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या
मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेलं फौजदारी कायदा
दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेनं काल मंजूर केलं. गेल्या २१ एप्रिलला यासंदर्भात अध्यादेश
जारी करण्यात आला होता. बालिकेवर लैंगिक अत्याचार किंवा सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी
आरोपीला अटकपूर्व जामीन देण्याची कोणतीही तरतूद या विधेयकात नाही
****
मराठा समाजाच्या
आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी, काल
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळांनी राज्यपाल सी.
विद्यासागर राव यांची वेगवेगळी भेट घेतली. मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव
कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणी बाबत राज्यपालांनी
हस्तक्षेप करून, राज्य सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी
मागणी त्यांनी केली. खासदार अशोक चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे-पाटील, यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. आरक्षण
देण्याबाबत सरकारला सर्वतोपरी सहकार्य करायला काँग्रेस, तयार आहे, असं
चव्हाण यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर
शिवसेना गंभीर असेल, तर त्यांनी सत्तेबाहेर पडावं असं ते म्हणाले.
माजी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या
नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानंही काल राज्यपालांची
भेट घेतली. मराठा आरक्षणा संदर्भात मागासवर्ग आयोगालाही या दोन्ही पक्षाच्या
शिष्टमंडळांनी काल भेट दिली.
शिवसेनेचे
मंत्री आणि आमदार काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले. अन्य प्रवर्गाच्या
आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी
मागणी करणारं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिलं.
****
मराठा
आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम आज सायंकाळी पर्यंत जाहीर केल्यास राज्यभरातलं आंदोलन
मागे घेतलं जाईल, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटलं आहे,
ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते.
समन्वय समितीनं सरकारला आपल्या सात मागण्यांची यादी
पाठवली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ अध्यादेश
काढावा, यासंबंधीचा कायदा करण्यासाठी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी,
राज्य सरकारच्या पद भरतीतल्या मराठा तरुणांच्या जागा तत्काळ भराव्यात, किंवा आरक्षणाचा
निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश असल्याचं,
पाटील यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलकांनी हिंसा न करण्याचं आवाहन विनोद पाटील यांनी
केलं आहे.
****
दरम्यान,
राज्यात कालही विविध भागात मराठा आरक्षण आंदोलन झालं. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. पुणे
जिल्ह्यात अनेक मोठी वाहनं पेटवून देण्यात आली. सोलापूर इथं
आंदोलकांनी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची तोडफोड केली, यावेळी प्रक्षुब्ध
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या एका
युवकानं परवा रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या निषेधार्थ मराठा मोर्चा आंदोलकांनी
काल दुपारी औरंगाबाद- जालना महामार्ग तीन तास रोखून धरला.
हिंगोली - नांदेड रस्त्यावर माळेगाव फाटा इथं आंदोलन
करण्यात आलं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड - लातूर मार्गावर सोनखेड इथं बसवर दगडफेक केली.
जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं काही समाजकंटकांनी दगडफेक केली, मात्र गुन्हे मराठा आंदोलकांवर
नोंदवण्यात आल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.
****
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणं सहकारी आणि
राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली आहेत, ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबई
इथं या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संस्थांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना काल सभापती
रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ
दिली. यामध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्यासह
अकरा सदस्यांचा समावेश आहे.
*****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड-सोयंगावचे कॉंग्रेस
आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत काल विधानसभा सदस्यत्वाचा
राजीनामा दिला. विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द
केला. या प्रश्नी राजीनामा देणारे ते औरंगाबाद जिल्ह्यातले तिसरे आमदार आहेत.
****
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून सहा
हजार ६२४ योजना पूर्ण करण्यासाठी, सात हजार ९५२ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनानं
मंजुरी दिली आहे. पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. यापैकी औरंगाबाद
विभागासाठी, १ हजार २१४ योजना प्रस्तावित असून, त्यासाठी १ हजार २५१ कोटी रुपयांचा
निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. याद्वारे राज्यभरात टँकरग्रस्त
असणाऱ्या प्रत्येक गावासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात
जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार झालेल्या गावांसाठी शासनाच्या
वतीनं ‘सामुहिक मत्स्य शेती योजना’ राबवण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय
आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल वैजापूर, खुलताबाद आणि
फुलंब्री तालुक्यातल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना भापकर यांच्या
हस्ते जलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. वृक्ष लागवडीचं उद्दीष्टही औरंगाबाद
जिल्ह्यानं पूर्ण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारत सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या
अशासकीय संचालक पदी, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉक्टर भागवत कराड यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सात संचालक या महामंडळावर आहेत.
****
प्रधानमंत्री
पीक विमा योजनेंतर्गत चालू
खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा
अर्ज सादर करण्याची
मुदत आज संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये आज संबंधीतांचे अर्ज आणि पीक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट
पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री
सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा प्रतिसाद
मिळत आहे. या योजनांमुळे आर्थिक
दृष्ट्या दुर्बल घटकातल्या नागरिकांनी आपलं कुटुंब सुरक्षित केलं आहे. याविषयी अधिक माहिती देत
आहेत आमचे वार्ताहर….
राजकुमार
शिवाजी सोनकांबळे, राहणार गुरळी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. प्रधानमंत्री सुरक्षा
योजनेचा मी लाभार्थी असून, वर्षाला १२ रूपये भरतो. आमच्या जीवन योजनेचे लाभ मिळावा
म्हणून आणि सुरक्षा विमा योजना चालू ठेवली.
नमस्कार, मी सचिन सोपान घोडगे , राहणार गुरळी तालुका
तुळजापूर. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत १२ रूपयांचा विमा काढलेला आहे.
आणि तो दरवर्षी माझ्या खात्यातनं ऑटोडेबिट होतो. या योजनेमुळे परिवाराला सुरक्षा मिळत
आहे. त्यामुळे मी केंद्र शासनाचा आभारी आहे.
****
जालना इथं रेल्वे उड्डाणपूलावर
एक खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरचे दोन तरुण ठार झाले. रविवारी
मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूरजवळ काल दुपारी कार
आणि दुचाकीच्या अन्य एका अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला.
****
तुळजापूर नगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी
नगरसेवक नारायण गवळी यांनी काल तुळजापूर इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,
ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष
आणि साकार मुद्रणालयाचे संस्थापक, रामकृष्ण जोशी यांचं काल निधन झालं. ते ८२ वर्षांचे
होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment