Sunday, 29 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २९  जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



Ø मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीनं विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत; आंदोलकांविरोधातले गंभीर गुन्हे वगळता, इतर गुन्हे मागे घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश

Ø रायगड जिल्ह्यात खाजगी बस दरीत कोसळून दापोलीच्या कृषी विद्यापीठातल्या ३३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू;

आणि 

Ø जालना, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि लातूरच्या पोलिस प्रमुखांच्या बदल्या, औरंगाबाद शहरातल्या दोन पोलिस उपायुक्तांचाही समावेश

****



 मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर तातडीनं विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर एकमत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात स्थापन मागासवर्गीय आयोगाला शक्य तितक्या लवकर आपला अहवाल सादर करण्याची विनंती करणार असून, हा अहवाल आल्यानंतर, तातडीनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकार यासंदर्भात दिरंगाई करत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले..



 राज्यसरकारच्या वतीनं याच्यामध्ये  दिरंगाई करण्यात येत नाहीयं. किंबहूना, न्यायालयामध्ये हा कायदा टिकला पाहिजे, यादृटिने मागच्या कालात ज्या त्रूटी राहिल्या त्या कश्या दूर करता येतील आणि सैंवेधानीक प्रकिया कशी पुर्ण करता येईल या संदर्भाचा  प्रश्र हा या ठिकाणी चालेला आहे.



 आंदोलन काळात आंदोलकांविरोधातले गंभीर गुन्हे वगळता, इतर गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या बैठकीनंतर बोलताना, राज्यात शांतता नांदावी, अशी विरोधी पक्षांची भूमिका असून, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन केलं. 

****



 मराठा आरक्षणा संदर्भात मराठा क्रांती मोर्चानं राज्यात सुरू केलेलं आंदोलन परवानगी घेऊन सुरू करण्यात आलं असून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर येत्या १ ऑगस्ट पासून जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी काल परळीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या आंदोलनाला बदनाम करणाऱ्या शक्ती सक्रीय झाल्या असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

****



 दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद शहरात सुमारे सहा ते सात कार्यकर्त्यांनी जलकुंभावर चढून घोषणाबाजी करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना समाजावून खाली उतरवलं.



 परभणी जिल्ह्यात कालही अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, जमावानं केलेल्या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. जिल्ह्यातली बससेवा काल सलग पाचव्या दिवशी बंद होती.



 नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भोकर फाटा, दाभड आणि महादेव पिंपळगाव परिसरात रस्ता रोको आंदोलन, तसंच टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नांदेड - बिदर या राष्ट्रीय महामार्गावर देगलूर - औरंगाबाद ही महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाची बस हिंसक जमावानं मारतळा गावाजवळ काल जाळली. या घटनेमुळे देगलूर आगारातून काल दुपारनंतर एकही बस सोडण्यात आली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 नाशिक इथं काल आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर धुळे रेल्वेस्थानका जवळ आंदोलकांनी धुळे-चाळीसगाव रेल्वे अडवून धरल्यानं सुमारे २० मिनिटं रेल्वेसेवा ठप्प झाली होती.

****



 केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं काल पवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं घटनेत दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून, याबाबत विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं पवार म्हणाले.

****



 रायगड जिल्ह्यात काल एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. काल सकाळी महाड जवळ पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सुमारे कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना हा अपघात झाला. बसमधले प्रकाश देसाई हे एकमेव प्रवासी वाचल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली आहे. या अपघातातल्या १७ प्रवाशांचे मृतदेह रात्री उशिरा पर्यंत बाहेर काढण्यात आले, पाऊस आणि धुक्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्यामुळे रात्री हे काम थांबवण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून, आज सकाळी उर्वरीत कर्मचाऱ्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 राज्यातल्या शाळामंध्ये गेल्या २०११ साली राबवण्यात आलेल्या विशेष पट पडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी आढळलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, तसंच शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार संचालकांनी कारवाई संदर्भात परिपत्रक काढलं आहे. या मोहिमेत दीड लाख विद्यार्थ्यांची संख़्या बोगस दाखवण्यात आली होती.

****



 राज्यातल्या विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या सहा, पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या १९ आणि पोलिस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद इथल्या राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून अपर्णा गिते यांची, जालना इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदी नामदेव चव्हाण, हिंगोली पोलिस अधीक्षक पदी योगेश कुमार, जालना पोलिस अधीक्षक पदी एस चैतन्य, उस्मानाबाद पोलिस अधीक्षक पदी राजा रामस्वामी, परभणी पोलिस अधीक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय, नांदेड पोलिस अधीक्षक पदी संजय जाधव, लातूर पोलिस अधीक्षक पदी आर एस माने, तर औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त पदी सी के मीना यांची बदली करण्यात आली आहे.

****



 देशात वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठीच्या विधेयका विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात, औरंगाबाद मधले एक हजार ४५० डॉक्टर सहभागी झाले होते. हे विधेयक भ्रष्टाचाराला चालना देणारं असल्यामुळे ते मंजूर करू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे. 

****



 मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्याग्रंथ पुरस्कारांचं वितरण’ आज औरंगाबाद इथं, नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉक्टर अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मसापच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणार असल्याचं परिषदेनं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****



 औरंगाबाद इथल्या डॉ. कांचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राचार्य राजाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठवाडा महसूल प्रबोधनीच्या सभागृहात एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर विरेगाव इथं काल एका मोटारीनं चिरडल्यानं, दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. भोकरदनच्या दिशेनं सुसाट निघालेली ही कार एका दुकानात घुसली. दुकानात खरेदी साठी आलेले दोन लहान मुलं जागीच चिरडल्या गेले तर अन्य एक जण जखमी झाला. तत्पूर्वी एका दुचाकीला या मोटारीनं ठोकरल्यानं दुचाकीवरच्या दोघीजणी जखमी झाल्या.

****



 जालना आणि  परभणी जिल्ह्यातल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृह सुरु करण्यासाठी पर्यायी  जागांचा प्रस्ताव तसंच वसतिगृह तातडीनं सुरु करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, बबनराव लोणीकर यांनी दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या वसतीगृहासाठी लोणीकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

****



 मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य स्तरीय बैठकीचं आयोजन आज लातूर इथं करण्यात आलं आहे. राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असून, राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या समन्वयक, आणि मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाईल.

****



 मराठा आरक्षणास पाठींबा म्हणून लातूर इथल्या राष्ट्रीय गुमास्ता मंडळ, आणि आडत व्यापारी संघटनेच्यावतीनं काल लातूरचा आडत बाजार बंद ठेवण्यात आला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, हा समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे त्यामुळे ती मागणी योग्य असल्याचं मत, राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे.

*****

***

No comments: