Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 26 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
अनुसूचित
जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल केले नसल्याचं सरकारनं आज लोकसभेत
सांगितलं. या अधिनियमात स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदलण्यात आला नसल्याचं संसदीय
कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, विद्यापीठांमध्ये
अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नती आणि नियुक्तीचा मुद्दा उपस्थित
करत, आरक्षणात कपात करण्याचा न्यायालयाचा निर्णय या वर्गांवर विपरित परिणाम करेल, असं
नमूद केलं. यावर सरकार न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यावर गंभीरतेनं विचार
करत असल्याचं कुमार यांनी सांगितलं.
****
दूरदर्शन
वाहिनी देशातली सार्वजनिक सेवा प्रसारक असल्यामुळे त्याच्यावरचे कार्यक्रम जनहिताच्या
मुद्यांवर आधारित असतात, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह
राठोड यांनी आज लोकसभेत सांगितलं. दूरदर्शनच्या कार्यक्रमांची तुलना खासगी वाहिन्यांवरच्या
कार्यक्रमांशी करता येणार नाही, कारण दोन्हींचे उद्देश आणि कार्यक्रमाचं स्वरुप वेगवेगळं
असतं, असं ते म्हणाले. दूरदर्शन आपल्या कार्यक्रमांमध्ये सुधारणा करत असल्याचंही त्यांनी
नमूद केलं.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आज परभणी शहरात
आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या दगडफेकीत
एका पोलिस शिपायासह अनेक जण जखमी झाले. जिंतूर इथंही दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात
आलं.
जालना
शहरात चार ठिकाणी, तसंच बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, विरेगाव इथं मुख्य मार्गांवर
चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. बदनापूर इथं जालना-औरंगाबाद मार्गावर आंदोलन सुरू असताना
जमावानं काही वाहनांवर दगडफेक केली.
सोलापूर
जिल्ह्यात आंदोलकांनी आज बार्शी बंदचं आवाहन केलं होतं. करमाळा इथं अज्ञातांनी एस टी
बस पेटवून दिली. जिल्ह्यातल्या बहुतांश गावांनी बंद पुकारला असून, सर्व व्यवहार ठप्प
आहेत.
नाशिक
जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनांची धग कायम असून, आजही ठिकठिकाणी आंदोलन
सुरू आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ झाला आहे,
तर आज सकाळपासून येवला इथं कडकडीत बंद पाळला जात आहे. पिंपळगाव बसवंत आणि मनमाड इथं
रस्ता रोको करण्यात आला.
सातारा
जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात ठिय्या आंदोलन सुरु असून, सर्व व्यवहार बंद आहेत. सांगली
जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात मांगले इथं जमावानं एसटी बस पेटवल्यानं काही काळ तणाव
निर्माण झाला होता. जिल्ह्यातल्या अनेक गावात आज बंद पाळण्यात आला.
****
दरम्यान,
मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधल्या देवळा-चांदवड
मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे
या दोन आमदारांनी आज त्यांचा राजीनामा मराठा क्रांती समाजाच्या समन्वयकांकडे सुपूर्द
केला. मात्र हे राजीनामे अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे दिले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
जालना
नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा
सादर केला. तर भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
****
प्रधानमंत्री
मुद्रा योजनेचा लाभ राज्यातल्या अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींना व्हावा यासाठी राज्य
सरकारच्या वतीनं या योजनेचं स्वतंत्र वेबपोर्टल विकसित करण्यात येत आहे. या पोर्टलवर
योजनेच्या माहितीबरोबर प्रशिक्षण आणि राज्यभरातल्या रोजगाराच्या संधी विषयक माहिती
उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. हे वेबपोर्टल
येत्या नऊ ऑगस्ट पासून सर्वांना उपलब्ध होईल.
****
कुठल्याही
मराठी तरुणानं आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी जीव गमावू नये, असं आवाहन महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. वास्तविक “मराठा समाज” म्हणून
इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी
तसं केलं नाही, अशी टीका ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे. कायद्याच्या पातळीवर
आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, हे
सरकारनं सविस्तर सांगावं, नाही तर सत्तेत राहू नये, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येत असून, विमा
भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
सहभाग घ्यावा आणि वाढलेल्या मुदतीचा लाभ घेऊन नैसर्गिक आपत्तीवर संरक्षण मिळवून घ्यावं,
असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment