Saturday, 21 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २१ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



v केंद्र सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभेनं १२६ विरुद्ध ३२५ मतांनी फेटाळला

v विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित

v रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघाती मृत्यूंबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

 आणि

v मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाचे मराठवाड्यात ठिकठिकाणी पडसाद  

****



 केंद्र सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभेनं १२६ विरुद्ध ३२५ मतांनी फेटाळला.



 सुमारे बारा तासांच्या दीर्घ चर्चेनंतर काल रात्री अकरा वाजेनंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. बिजू जनता दलानं, या चर्चेत सहभागी होणार नसल्याचं सांगत, चर्चा सुरू होण्यापूर्वीच सभात्याग केला. शिवसेना तसंच तेलंगणा राष्ट्र समितीच्या सर्व सदस्यांनीही या चर्चेदरम्यान लोकसभेत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय अण्णाद्रमुकच्या खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं.

 तत्पूर्वी तेलगु देशम पक्षाचे खासदार जयदेव गल्ला यांच्या भाषणानं चर्चेला प्रारंभ झाला. गल्ला यांनी या प्रस्तावावर बोलताना, आंध्रप्रदेशावर होत असलेल्या अन्यायासाठी विद्यमान भाजपप्रणीत सरकार इतकाच काँग्रेस पक्षही जबाबदार असल्याचं नमूद केलं. विभाजनानंतर नवनिर्मित आंध्रप्रदेशावर होत असलेल्या भेदभावामुळे सरकारवर विश्वास राहिला नसल्यानं, आपल्या पक्षानं हा अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचं, गल्ला यांनी नमूद केलं.



 राफेल विमान खरेदी प्रकरणी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देशाची दिशाभूल केल्याचा आरोप, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रस्तावाच्या बाजुने बोलताना केला. केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह रोजगार, जीएसटी, विमुद्रीकरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी टीका केली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी, राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावत, संरक्षण विभागाच्या कराराचे मुद्दे जाहीर करता येत नसल्याचं, त्यांनी नमूद केलं.



 राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे पुरेसं संख्याबळ असूनही, अविश्वास प्रस्ताव स्वीकारून सरकारनं सशक्त लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.



 तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारीक अन्वर या सदस्यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मत मांडलं.



 या चर्चेला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हा अविश्वास प्रस्ताव केंद्र सरकारच्या विरोधात नसून, काँग्रेस आणि विरोधकांचा आपल्या संभाव्य आघाडीची चाचपणी करण्याचा प्रयत्न असल्याचं नमूद केलं. काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकाळात राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून आंध्रप्रदेशचं विभाजन केल्यानं, हा वाद निर्माण झाल्याचं, सांगत पंतप्रधानांनी, आंध्रप्रदेशच्या नव्या राजधानीच्या उभारणीसह सगळ्याच क्षेत्रात मदतीचं आश्वासन दिलं.

राफेल विमान खरेदीवर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचं भारतासह फ्रान्सनेही खंडन केल्याचं सांगत पंतप्रधानांनी, डोकलाम तसंच सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेले आरोपही फेटाळून लावले.

****



 केंद्र सरकारवर खोटे आरोप केल्याबद्दल काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्ष हक्कभंग प्रस्ताव आणेल असं संसदीय व्यवहार मंत्री अनंतकुमार यांनी संसदेबाहेर बातमीरांशी बोलतांना सांगितलं.



 राहुल गांधींकडे टीका करण्यासारखे मुद्दे नसल्यानं त्यांनी बाष्कळपणाच केला अशी टीका, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरुन केली.

****



 विधीमंडळाचं नागपूर इथं सुरु असलेलं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्य सरकारनं २१ हजार दोनशे २२ कोटी रुपयांच्या जलद विकास कार्यक्रमांची घोषणा काल विधानसभेत केली. पुढच्या दीड वर्षात याची अंमलबजावणी होणार असून, यासाठीचं देखरेख केंद्र नागपूरला असणार आहे. सिंचनाचे ८९ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १३ हजार ४२२ कोटी रुपये तर ठिबक सिंचनासाठी १०० कोटी रुपये अनुदान इतकी रक्कम दिली जाणार आहे.

****



 विधानसभेत काल आमदार प्रशांत बंब, आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सर्रास सुरू असलेल्या गुटखा विक्रीकडे लक्ष वेधलं. राज्यात गुटखा बंदी असूनही, गुटखा विक्री सुरू असल्याबद्दल संबंधित अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली, तर प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि गुटखा व्यापाऱ्यांचं संगनमत असल्याचा आरोप बंब यांनी केला. लोकप्रतिनिधींनी गुटखा सेवन करू नये, असं आवाहन आमदार आशिष देशमुख यांनी केलं.



 अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी, या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना, सर्व सदस्यांनी आपल्या सूचना सरकारकडे सादर कराव्यात, त्या आधारे गुटखा बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगितलं.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जमाफी साठीच्या निकषात सरकारनं बदल केला असून आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याबाबत मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. या योजने अंतर्गत आतापर्यंत १५ हजार ८८२ कोटी रुपय कर्जमाफी करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 देशभरात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघाती मृत्यूंबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या समस्येकडे लक्ष देण्याचे निर्देश न्यायालयानं रस्ते सुरक्षा समितीला दिले आहेत. या समितीनं आपला अहवाल दोन आठवड्यांच्या न्यायालयात सादर करायचा आहे.

****



 मुंबई इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना इथल्या उपकेंद्रात पुढच्या महिन्यापासून नियमित तासिका सुरू होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा़सदार रावसाहेब दानवे यांनी काल एका प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती दिली. उपकेंद्राची इमारत उभारण्याचं काम पूर्ण होईपर्यंत जालना औद्योगिक वसाहतीमधल्या बैजो शीतल सिड्सच्या इमारतीत या तासिका घेण्यात येणार असल्याचं दानवे यांनी  सांगितलं.

****



 मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद काल मराठवाड्यात ठिकठिकाणी उमटले. परभणी इथं काही अज्ञात व्यक्तींनी दहा बसेसवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. लातूर इथंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात परळी, माजलगाव, केज भागात एसटी बसवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. लातूर इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुंडन करून निषेध केला. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर, कळंब इथं तसंच जालना जिल्ह्यात परतूर, जाफ्राबाद, मंठा इथंही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नांदेड इथं मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून, मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

****



 अखिल भारतीय मालवाहतुकदार संघटनेनं पुकारलेल्या भारत बंद आणि चक्काजाम आंदोलनाला काल पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला, जालन्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेनं केला आहे. औरंगाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यातही या बंदचा परिणाम जाणवला.



 पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत, वर्षातून एकदाच पथकर द्यावा, विम्याचा हप्ता कमी करावा यासह या आणि अन्य विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

****



 परभणी जिल्ह्यात असोला- त्रिधारा रस्त्यावर ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत, काल एक ट्रकमधून गुटख्याच्या ५९ गोण्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांसह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

****



 मातंग समाजाच्या विविध मागण्यासांठी काल जालना इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मातंग आरक्षणाची मागणी मंजूर करून अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी, यासह अनेक मागण्यांचं निवेदन तहसीलदार विपिन पाटील यांना देण्यात आलं.

****



 थकीत शिष्यवृत्तीचं वाटप तत्काळ करण्यात यावं, यासह अन्य मागण्यांसाठी काल परभणी जिल्हा कचेरीवर भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थी सेनेनं दिला आहे.

****



 दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं स्वागत केलं आहे. यापूर्वीही अशा घोषणा झाल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं, किसान सभेचे अजित नवले यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यावेळी मात्र असा विश्वासघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल, असं त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे. 

****



 येत्या २३ तारखेपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ञांनी दिले आहेत.

*****

***

No comments: