आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध मराठा संघटनांच्या
वतीनं आज मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यात पुकारण्यात
आलेल्या बंदला सकाळ पासून सुरूवात झाली. आंदोलन कर्त्यांनी रास्ता रोको केल्यानं तसंच
निषेधमोर्चे काढल्यामुळे अनेक मुख्य रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत झाली असून, ठाणे,
नवी मुंबई आणि मुंबईत काही बसेसची मोडतोड करण्यात आल्याचं वृत्त आहे. मुंबईतल्या कामगार
संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असला तरी बंदला आपला पाठिंबा नसल्याचं
शिवसेनेनं जाहीर केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या
आंदोलना दरम्यान औरंगाबाद इथं आज आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला. जगन्नाथ सोनवणे असं
त्यांचं नाव असून, त्यांनी काल आंदोलना दरम्यान विष प्राशन केलं होतं, औरंगाबाद इथं
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान
त्यांचं निधन झालं.
****
सामाजिक माध्यमावरच्या संदेशांवर तत्काळ विश्वास
ठेवण्याची सवय योग्य नाही, असं सरन्यायाधीश दीपक मिश्र यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय
विधी संघाच्या एका कार्यक्रमात, अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. नागरिकांनी याबाबतीत
अधिक जबाबदारीनं वागावं आणि माध्यमांनीही आत्मचिंतन करून स्वत:ला परिपक्व करावं, असं
आवाहन मिश्र यांनी यावेळी केलं.
****
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे पासून
सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे.
लष्क़र ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांना सुरक्षादलानं या भागात घेरलं आहे. श्रीनगर
इथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाच्या एका जवानाला वीरमरण आलं असून, या
चकमकीत अन्य एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे काल रात्री एक तीन
मजली इमारत कोसळली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झाल्याचं पोलिसांनी
सांगितलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुरक्षित बाहेर काढलं असून, बचावकार्य
सुरू आहे.
*****
***
No comments:
Post a Comment