Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२४ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाच्या मागणी साठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान, मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात, औरंगाबाद अहमदनगर मार्गावर, कायगाव टोका इथं, या तरुणाचा काल गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला होता. खासदार चंद्रकांत खैरे आज सकाळी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले असता, आंदोलकांनी खैरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
केली. जमावाच्या विरोधामुळे खैरे यांना परत जावं लागलं.
मराठा आरक्षणासाठी आज बंद पुकारण्यात आला
आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर हिंगोली तसंच जालना इथं एसटी बसची वाहतूक पूर्णतः बंद
आहे. उस्मानाबाद इथंही बस वाहतुक तसंच शैक्षणिक संस्था आज बंद आहेत. आंदोलनकर्त्यानी
शहरातून दुचाकी फेरी काढून बंद राखण्याचं आवाहन केलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. उस्मानाबाद तुळजापूर रस्त्यावर वडगाव नजिक रस्त्यावर
टायर पेटवल्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. औरंगाबाद इथंही
आंदोलकांनी वाहनफेरी काढून बंद पाळण्याचं आवाहन केलं.
जालना शहरात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या
वतीनं आज सकाळी शिवाजी पुतळा इथून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदारांची प्रतिकात्मक
अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, जालना शहरासह अंबड, भोकरदन, राजूर, मंठा, बदनापूर
इथं बंद पाळण्यात आला असून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये
बहुतांशी बंद आहेत. शहरातून बाहेर जाणाऱ्या एसटी बसेसही बंद असून, रिक्षा चालकही बंद
मध्ये सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे.
बीड शहरातही बंद पाळण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. बीड मध्यवर्ती बस स्थानकातून सुटणाऱ्या बसच्या ४६१ फेऱ्या रद्द करण्यात
आल्या आहेत. तर जिल्ह्यातल्या शाळा-महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यात ही विविध तालुक्यातले व्यवहार पूर्णपणे
बंद आहेत.
****
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, तसंच राष्ट्रवादी
काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा आरक्षण प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यात काल
झालेल्या युवकाच्या मृत्यूकडे लोकसभेचं लक्ष वेधलं. या युवकाच्या कुटुंबीयांना पन्नास
लाख रुपये मदत जाहीर करावी, आणि आरक्षणाच्या मुद्यावर गांभीर्यानं विचार करावा, अशी
मागणी यावेळी करण्यात आली.
****
जमावाद्वारे होणाऱ्या हत्यांसंदर्भात गृहमंत्री
राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं. यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या
नेतृत्वाखाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला असून हा गट उच्चस्तरीय समितीनं केलेल्या
शिफारशींवर विचारविनिमय करून, पंतप्रधानांना अहवाल देईल, असं गृहमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं. याबाबत कायदा करण्याचे संकेतही गृहमंत्र्यांनी दिले.
****
मुस्लीम
समाजातल्या बहुपत्नित्व आणि निकाह हलाला या प्रथांना विरोध करणाऱ्या याचिकांची
सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे
निर्देश दिले आहेत. याच विषयावर यापूर्वीच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या घटनापीठाकडे
ही याचिका वर्ग करावी असे आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठानं दिले.
****
लोकप्रतिनिधी
दोषी असलेल्या फौजदारी प्रकरणांना आपिलीय न्यायालयानं स्थगिती दिली नसल्यास, संबंधित
लोकप्रतिनिधी, संबंधित सदनाचे सदस्य म्हणून अपात्र ठरतील, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवरचा निर्णय,
न्यायालयानं राखून ठेवला आहे. फौजदारी
प्रकरणात दोषी ठरलेले लोकप्रतिनिधी, न्यायालयाच्या
निर्णयाविरोधात तीन महिन्याच्या आत अपील केल्यानंतर, आपल्या
पदावर काम करु शकतात, ही लोकप्रतिनिधी कायद्यातली तरतूद सर्वोच्च न्यायालयानं जुलै
२०१३ मध्ये
दिलेल्या निकालात रद्द केली होती.
****
पुणे आकाशवाणीच्या माजी वृत्त निवेदक
सुधा नरवणे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या
भावविश्वात एक अनोखं स्थान असणारा आवाज हरपला आहे, अशा
शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आकाशवाणीला
सर्वसामान्यांशी जोडणारा एक दुवा निखळला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नरवणे यांचं परवा
रविवारी हदयविकाराच्या झटक्यानं पुण्यात निधन झालं, त्या ८८ वर्षांच्या होत्या.
****
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं आज मराठवाड्याचा विकास या विषयावर
निवृत्त विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी
चार वाजता व्याख्यान होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment