Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v १०० वस्तुंवरचा वस्तु आणि सेवा कर कमी करण्याचा तर सॅनेटरी
नॅपकीनवरचा कर पूर्णपणे रद्द करण्याचा जीएसटी परीषदेत निर्णय
v मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील;
पंढरपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला विरोध न करण्याचं महसूल मंत्र्यांचं आवाहन
v वैद्यकीय शास्त्राशी संबंधित १० नवीन
अभ्यासक्रम सुरू करणार- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे
आणि
v न्यूझीलंडविरूद्धच्या हॉकी सामन्यांत भारताचा विजय तर
महिलांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत - इंग्लंड यांच्यातला सामना बरोबरीत
****
दूरचित्रवाणी संच, फ्रीज, वॉंशिंग मशीनसह
१०० वस्तुंवरचा वस्तु आणि सेवा कर – जीएसटी कमी करण्याचा तर सॅनेटरी नॅपकीनवरचा कर
पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जीएसटी परीषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
वस्तू आणि सेवा कर परिषदेची २८ वी बैठक काल नवी दिल्ली
इथं अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच बैठकीत हस्तकला आणि बांबू
फ्लोरींगवरचा कर १२ टक्के, इथेनॉलवर पाच टक्के, तर रंग आणि वॉर्निशवर २८ टक्क्यांवरुन
१८ टक्के कर आकारण्याचा निर्णय झाला आहे. एक हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या चपला
आणि बुटांवर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे.
दरम्यान, व्यावसायिकांना पाच कोटी रुपयांपर्यंतची
आयकर विवरण पत्र आता दर तीन महिन्यांनी भरता येतील. तर कराची रक्कम दर महिन्याला भरावी
लागेल. या निर्णयाचा ९३ टक्के करदात्यांना लाभ मिळणार आहे.
****
मराठा समाजाच्या मागण्या शासन पूर्ण करत असून पंढरपूर
मधल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला
विरोध करू नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मराठा
महामोर्चानं मागण्या मान्य न केल्याचा आरोप करत, पंढरपूर इथं उद्याच्या आषाढी एकादशीच्या
मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर
पाटील यांनी हे आवाहन केलं आहे.
मराठा समाजानं केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता
शासन पातळीवर करण्यात आली आहे. तसंच उर्वरित मागण्यांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. मराठा
समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे, ही शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या परळी इथं सुरू असलेलं
मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन काल चौथ्या दिवशीही सुरूचं होतं. या आंदोलनाला पाठिंबा
देण्यासाठी काल राज्यभर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं.
औरंगाबाद इथं. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी
क्रांती चौकात धरणं आंदोलन केलं, हे आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी
व्यक्त केला.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा
समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन सुरु करण्यात आलं. जवळाबाजार इथं चक्काजाम आंदोलना दरम्यान
तीन बसवर दगडफेक झाल्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. औंढा तालुक्यातल्या
येहळेगाव सोळंके इथंही एका बसवर दगडफेक करण्यात आली.
जालना जिल्ह्यात मंगळवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
आंदोलकांनी जिल्ह्यात परीवहन महामंडळाच्या तेरा बसची तोडफोड केली तर दोन बसला आग लावण्यात
आली.
****
प्लास्टिकच्या कायम स्वरुपी वापराचा मार्ग आपण शोधला
पाहिजे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत प्लास्टिक निर्यात प्रसार परिषदेत बोलत होते. प्लास्टिकला जैविक रुपात बदलण्यासाठी तसंच त्याचा पुनर्वापर करण्याची गरजही
त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि पुनर्वापर होण्यासाठी
संशोधन करणं गरजेचं असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.
****
राज्यात एक जुलै ते ३१ जुलै
या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत १० कोटी ८५ लाख ९९ हजार झाडं
लावण्यात आली आहेत. सर्वाधिक ६८ लाख ६४ हजार इतकी वृक्ष लागवड नांदेड
जिल्ह्यात झाली असून, त्यापाठोपाठ नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली,
औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही जास्त प्रमाणात वृक्ष लागवड झाली.
लातूर, बीड, जळगाव,
जालना, पुणे, हिंगोली आणि
पालघर जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाली असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
सांगितलं.
****
बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजूरांसाठी
३० सप्टेंबर अखेर एक कल्याणकारी योजना आखण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं
केंद्र सरकारला दिले आहेत. यानंतर सरकारला यासाठी आणखी
वेळ दिला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सरकारनं
या योजनेचा आराखडा कामगार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला असून, १०
ऑगस्ट पर्यंत त्यावर राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत, तसंच
इतर घटक देखील ३० ऑगस्ट पर्यंत याबाबत आपल्या सूचना मांडू शकत असल्याचं सरकारनं न्यायालयात
सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
वैद्यकीय शास्त्राशी संबंधित १० नवीन अभ्यासक्रम सुरू
करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकी नंतर वार्ताहरांशी बोलत होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा सोबत सामंजस्य करार करून हे
अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. या अभ्यासक्रमांद्वारे १४ लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
आषाढी
वारीसाठी आळंदी, तसंच देहूहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या
पालख्या काल वाखरीला पोहोचल्या. तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या
पालखीचं उभं रिंगण भंडीशेगाव इथं झालं.
तर दोन्ही पालख्यांचं एकत्रित रिंगण
बाजीराव विहीर इथं झालं. हा रिंगण
सोहळा भाविकांना अनुभवता यावा याकरता एस.टीच्या शंभर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. आज वाखरी इथं उभं रिंगण झाल्या नंतर या दोन्ही पालख्या पंढरपुरात दाखल
होतील.
पैठणहून
निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी होळे इथला मुक्काम
आटोपून
आज सकाळी पंढरपुरात दाखल होत आहे. तर शेगावचे संत गजानन महाराज तसंच अमळनेरचे
संत सखाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपुरात दाखल झाल्या.
****
दरम्यान, पंढरपूर इथं उद्या साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त
१२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी नांदेड
विभागातून आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद,
नगरसोल -पंढरपूर- नगरसोल,
अकोला-पंढरपूर-अकोला,
बिदर-पंढरपूर-बिदर या विशेष
गाड्या चालवण्यात येणार आहेत.
****
गुरु पौर्णिमेसाठी शिर्डी इथं जाणाऱ्या
भक्तांसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद-नगरसोल-हैदराबाद अशी एक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद-नगरसोल
ही विशेष गाडी २६ जुलै रोजी हैदराबाद इथून दुपारी सव्वा तीन वाजता निघेल आणि निजामाबाद,
नांदेड, औरंगाबाद मार्गे नगरसोल इथं २७ जुलै रोजी
सकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही
गाडी नगरसोल इथून २९ जुलैला सायंकाळी साडे पाच वाजता सुटेल आणि ३० तारखेला सकाळी साडे
आठ वाजता हैदराबादला पोहोचेल.
****
पीक पेऱ्याचं अचूक संकलन करण्यासाठी
कृषी विभागाने अधिसूचना जारी केली असून देशात अशा प्रकारचा निर्णय प्रथमच झाल्याची
माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. पेरणीचं सुक्ष्म नियोजन
आणि अचूक संकलन होण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगानं बैठका घेऊन राज्य
शासनाला सूचना केल्या होत्या. या सूचना शासनाने स्वीकारल्या असून आयोगाच्या सूचने नंतर
शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
****
लातूरच्या विकासासाठी मंजूर करण्यात
आलेल्या पाच मेगावॅट निर्मिती क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य सरकारच्या
विविध विभागांकडून ३१ कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. विजेच्या बाबतीत लातूर महापालिका स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी
राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून हा प्रकल्प मंजूर केला आहे. दरम्यान, दोन महिन्याच्या आत प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश उर्जा
मंत्र्यांनी दिले असून दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी
पाच जागांची निवड करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमृत योजनेच्या माध्यमातून परभणी शहराचा पाणीप्रश्न
प्राधान्यानं सोडवण्यात येईल, असं महानगर पालिका
आयुक्त रमेश पवार यांनी म्हटलं आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काल प्रथमच घेतलेल्या
वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शहरात लवकरच डांबरी रस्ते, पथदिव्यांची उभारणी
आणि वृक्षलागवड केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
भारत आणि न्यूझीलंड हॉकी सामन्यांच्या मालिकेत काल
बेंगरुळु इथं झालेला दुसरा सामना भारतानं ३-१ अशा फरकानं जिंकला. तीन सामन्यांच्या
या मालिकेत भारत २-० नं आघाडीवर आहे.
इंग्लंड इथं महिलांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल
भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातला सामना बरोबरीत सुटला. भारताच्या नेहा गोयलनं २५
व्या मिनिटात गोल केला तर इंग्लंडच्या संघानं ५४ व्या मिनिटात गोल करून बरोबरी साधली.
भारतीय संघाचा दुसरा सामना आता गुरूवारी आयर्लंड सोबत होणार आहे.
****
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी
काल जालना इथं खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या राष्ट्रीयीकृत आणि
ग्रामीण बँकांच्या माध्यमातून आज पर्यंत ५९ हजार ७९७ शेतकऱ्यांना ४२६ कोटी रुपयांचं
पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात महाकाळा इथं काल दुपारी
रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
धनंजय गाढे असं या युवकाचं नाव असून, तो अंतरवाली
इथला रहिवासी आहे.
*****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणारतून ३ हजार ८७१ दश लक्ष घनफूट वेगानं
पाणी सोडण्यात येत आहे. या धरणारच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, धरण
९० टक्के भरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment