Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली सर्वपक्षीय
बैठक संपली असून, या बैठकीत मराठा आरक्षणावर एकमत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मागासवर्गीय आयोगाला शक्य तितक्या लवकर या संदर्भातला अहवाल सादर करण्याची विनंती करणार
असून, हा अहवाल आल्यानंतर तातडीनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. राज्य सरकार आरक्षणाच्या विरोधात नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
आंदोलन काळात गंभीर गुन्हे सोडून, इतर गुन्हे मागे घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश
दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान,
या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, राज्यात शांतता
नांदावी, अशी विरोधी पक्षांची भूमिका असून, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन
केलं. तर आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत केली.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद शहरात सुमारे सहा ते सात कार्यकर्त्यांनी हनुमान नगर
इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. पोलिस
अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
परभणी
जिल्ह्यात आज सर्वत्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी शहरात जमावानं केलेल्या
दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. परभणी जिल्ह्यात बससेवा आज सलग पाचव्या दिवशी
बंद आहे.
नांदेड
जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भोकर फाटा, दाभड आणि महादेव पिंपळगाव परिसरात
रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तसंच टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नाशिक
इथं आज आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सोलापूर
जिल्ह्यातल्या हिपरगा इथं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रतिकांत पाटील यांनी जलसमाधी
आंदोलन सुरु केलं, तर धुळे रेल्वेस्थानकाजवळ आंदोलकांनी धुळे-चाळीसगाव रेल्वे अडवून
धरल्यानं सुमारे २० मिनिटं रेल्वेसेवा ठप्प झाली होती.
****
महाडजवळ
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात आज एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या
अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. आज दुपारी हा अपघात झाला. या बसमध्ये दापोलीच्या कोकण
कृषी विद्यापीठाचे ३० ते ३५ कर्मचारी होते, महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना बस २००
फूट दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला. बसमधले प्रकाश नारायण देसाई हे एकमेव प्रवासी
वाचल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली आहे. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम
सुरु असून, पोलादपूर-महाबळेश्वर हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख
व्यक्त केलं आहे.
****
कौटुंबिक
प्रकरणं हाताळतांना कौटुंबिक न्यायालयं सामाजिक जाणीव ठेवून वेगळ्या पध्दतीनं काम करतील,
अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा
यांनी आज व्यक्त केली आहे. धुळे इथं आज धुळे जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन बोरा
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौटुंबिक न्यायालयाच्या स्थापनेमुळे कौटुंबिक
वाद सोडवण्यासाठी होणारा विलंब कमी होईल अशी माहिती त्यांनी यावेळी देण्यात आली.
****
देशात
वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय
आयोग स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात औरंगाबादमधील
एक हजार ४५० डॉक्टर सहभागी झाले होते. हे विधेयक भ्रष्टाचाराला चालना देणारं असल्यामुळे
ते मंजूर करू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या विविध भागात राजकीय पक्ष, व्यावसायिक आणि वैयक्तिक शुभेच्छा संदेश फलक अनधिकृतपणे
लावणाऱ्यांवर कारवाई करत, ते काढण्यात येत आहेत. प्रशासनानं २७ जुलैपर्यंत हे अनधिकृत
फलक काढण्याचं आवाहन केलं होतं. शहराला विद्रुप करणारे हे अनधिकृत फलक महानगरपालिका
आणि पोलिस प्रशासन यांच्या वतीनं काढण्यात येत असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क
अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ‘ग्रंथ पुरस्कारांचं वितरण’ नव्वदाव्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते
उद्या औरंगाबाद इथं होणार आहे. हा कार्यक्रम मसापच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृह
इथं संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
****
No comments:
Post a Comment