Thursday, 19 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या धरणात हजार ६८१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असल्याचं, जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 औरंगाबाद इथं महानगर पालिकेच्या विविध प्रभागात प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. या दुकानदारांकडून सहा हजार तीनशे रूपये दंड आकरण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी महानगर पालिकेच्यावतीनंही काल शहरात प्लास्टीक बंदी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****



 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे आत्मकेंद्री नसून समाज केंद्री असल्याचं मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक तथा पत्रकार रविंद्र गोळे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांचं  साहित्य हे सर्व समाजाचं प्रतिबिंब देणार आणि जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारं असल्याचं ते म्हणाले.

****



 राज्यातल्या रास्त भाव दुकानात लोह आणि आयोडिनयुक्त मीठ स्वस्त दरात उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते काल नागपूर इथं या योजनेचा शुभारंभ झाला. शासनाचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि टाटा आयर्न यांच्या संयुक्त विद्यमानं ही योजना राबवली जाणार आहे.

****



 मराठवाडा आणि विदर्भातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या एका दुग्ध विकास योजनेतून राज्यातल्या सत्तावीस हजार दूध उत्पादकांना लाभ झाल्याचं सरकारनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळानं सुरू केलेल्या या योजनेद्वारे सुमारे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी या भागातल्या सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

*****

***

No comments: