Tuesday, 31 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीतल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरात लवकर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं आज ‘राजाराम महाराजांचे विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिला कायदा हा मराठा आरक्षणाचा केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आंदोलकांनी कायदेशीर बाबी समजून घ्याव्यात, हिंसाचार करु नये, तसंच स्वत:चा जीव गमावू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण मिळावं, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळवल्या असून, स्मारकाच्या उंचीवरुन राजकारण होणं ही बाब दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत गृह विभागाची बैठक घेऊन, राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. २४ जुलैपासून राज्यात हे आंदोलन सुरु असून, अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या मन्याड धरणाजवळ जलसमाधी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी इथल्या इंदापूर फाट्यावर आज आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करत बस पेटवण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं पालम लोहा राज्य मार्गावर मुंडण आंदोलन करण्यात आलं.

नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस, शिवशाहीच्या ६६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरातही आज मराठा क्रांती संघटनेच्या वतीनं करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निदर्शनं करण्यात आली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालच्या बंदनंतर आज जनजीवन सुरळीत सुरु आहे.

****

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी नागरिकांनी सूचना तसंच विचार पाठवावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी ‍अ‍ॅपवर किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर नागरिकांनी आपले विचार मांडावेत, असं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. नवीन तसंच उत्तम कल्पनांचा अंतर्भाव आपल्या लाल किल्यावरच्या भाषणात केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाड्यात बांबू लागवड झाली तर मराठवाड्याचं चित्र बदलू शकतं, असा विश्वास महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं ५१ हजार बांबू लागवड योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यावेळी उपस्थित होते. बांबुच्या लागवडीची, संवर्धनाची आणि विक्रीची माहिती देणारं केंद्र लोदगा परिसरात, राष्ट्रीय बांबू मिशन आणि राज्य सरकारच्या बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून उभारलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

****

जळगाव तसंच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या दोन्ही महानगरपालिकांची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवत आहेत तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. येत्या तीन ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

****

जालना जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांना पदाची सूत्रं सोपवली.

****

चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं महिला एकेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनानं तुर्कस्तानच्या एलिये देमिरबेग हिचा २१ - १७, २१ - आठ असा पराभव केला. पुरुष एकेरीत के श्रीकांत आणि बी साई प्रणितही दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत.

****

भारत आणि इंग्लंड याच्यात पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून बर्मिंगहम इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका भारतानं, तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडनं जिंकली आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...