Sunday, 22 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.07.2018 13.00




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या दिवाळीपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या निर्णयाचा राज्यातल्या १९ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर २१ हजार ५३० कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांसाठी बाल संगोपन रजा आणि पुरुष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व सुटी देण्याचाही सरकार विचार करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. रोजच्या कामाच्या वेळेत पंधरा मिनिटांची वाढ करून शनिवार, रविवार सुटी देत पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रस्तावावर सरकार अभ्यास करत असल्याचंही ते म्हणाले.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची हिंसकता सोलापूर जिल्ह्यात वाढली आहे. सकाळ पासून जिल्ह्यात दहा बस फोडल्याची तर नान्नज इथं एक बस जाळल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. बाजीराव विहिरी पासून जवळच असलेल्या खेडभाळवणी चौकात काही आंदोलकांनी एका एस. टी. बसवर दगडफेक केली.



 मंगळवेढा आगाराच्या तीन बसचं नुकसान झाल्यानं आगार व्यवस्थापक मधुरा जाधव यांनी पुढील निर्णय होई पर्यंत आगारातल्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्याची माहिती दिली. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.



 दरम्यान, आषाढी एकादशी महापूजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये, म्हणून आंदोलन सुरू केलेल्या मराठा आणि धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मराठा आणि धनगर समाजातल्या सुमारे १५ कार्यकर्त्यांना तालुका पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

****



 जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी तपास मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी कुलगाम जिल्ह्यातल्या प्रशिक्षु पोलिस मोहम्मद सलीम शहा यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सामील होते, असं राज्य पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितलं.



 दरम्यान, कठुआ जिल्ह्यात आज आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक घुसखोर ठार झाला. 

****



 लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानं चांगला संदेश गेला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या संमेलनात बोलत होते. राजकीय मतभेद असले, तरी सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं हा एक चांगला संदेश असल्याचं ते म्हणाले. परदेशी भूमीतून देशातल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****



 मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये येत्या १५ ऑगस्ट रोजी एक लाख वृक्ष लावण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिला आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सात वर्षांपासून रखडलं असल्यामुळे पळसपे ते इंदापूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. हे खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवण्यात येतील, असं आश्वासन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. सरकारनं दिलेल्या मुदतीत रस्ते व्यवस्थित केले नाहीत, तर १५ ऑगस्टपासून खड्ड्यांत वृक्षारोपण केलं जाणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं आहे.

****



 सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर अकोले गावाजवळ क्रूझर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. आज सकाळी हा अपघात झाला.

****



 भारतानं काल नवी दिल्लीत झालेल्या कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तीन रौप्य आणि कांस्य पदकं पटकावली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फ्री स्टाईल प्रकारात ७० किलो वजनी गटात विशाल कालीरामननं, ५७ किलो वजनी गटात नवीन यानं, तर ७९ किलो वजनी गटात सचिन गिरी यानं रौप्य पदक मिळवलं. करण यानं ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं.

****



 झेक रिपब्लिक इथं सुरु असलेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मुहम्मद अनासनं ४०० मीटर शर्यतीत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत ४५ पूर्णांक २४ शतांश सेकंदांच्या वेळेसह नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. महिलांच्या शर्यतीत एम. आर. पूर्वाम्मानं ५३ पूर्णांक एक शतांश सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं.

*****

***

No comments: