Saturday, 20 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  मराठवाड्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस; अंगावर वीज कोसळून चौघांचा मृत्यू
Ø  बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी नऊ महिन्यात निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Ø  राज्य शासनाचे २०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर
Ø  भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
 आणि
Ø  राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष तसंच महिला संघाला विजेतेपद
****

 मराठवाड्याच्या बहुतांश भागात काल अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाला. या पावसात विभागात चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात दोन महिलांसह एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. फाटा गावातल्या सोळा वर्षांची मुलगी आणि तिची आई सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना वीज कोसळून त्या जागेवरच ठार झाल्या तर गुंडा इथं एक इसम पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबला असतां, झाडावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.

 जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यात रास्तळ इथं एकनाथ नारायण डवले या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्यात जालना, बदनापूर, जाफराबाद, अंबड, भोकरदन तालुक्यात पाऊस झाला. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे.

 बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बीड तालुक्यात वाकी नाल्याला पूर आला. या पुरात एक बैलगाडी वाहून गेली, या घटनेत शेतकरी दाम्पत्य जखमी झाले, तर दोन्ही बैल दगावल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यातही काल अनेक भागात हलका पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात वैजापूरसह अनेक भागात दुपारनंतर पावसानं हजेरी लावली.

 अहमदनगर जिल्ह्यातही जामखेड, संगमनेर, तसंच अहमदनगर तालुक्यात पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे
****

 १९९२ च्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी विशेष न्यायालयानं पुढच्या नऊ महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, आणि उमा भारती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी होत असलेले विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत, त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****

 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ येत्या दोन ऑगस्टपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाचा पुढच्या शुक्रवारी २६ जुलै रोजी समारोप होणार होता, मात्र पटलावर ठेवलेली सगळी विधेयकं संमत करून घेण्यासाठी सरकार, हा कार्यकाळ वाढवण्याच्या विचारात असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक विधेयकासह सुमारे तेरा विधेयकं संसदेसमोर प्रलंबित आहेत. तिहेरी तलाक विधेयक अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात चर्चेला येण्याची शक्यता आहे. गेल्या मंगळवारपर्यंत लोकसभेचं कामकाज निर्धारित वेळेच्या १२८ टक्के तर राज्यसभेचं कामकाज ९८ टक्के झालं आहे. लोकसभेच्या कामकाजाचा हा गेल्या वीस वर्षांतला विक्रम असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 सुमारे सात कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड योजनेत सामावून घेण्यासाठी केंद्र सरकार एक मोहीम आखत आहे. कृषीमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. आतापर्यंत साडे सहा कोटी शेतकऱ्यांना ही किसान क्रेडीट कार्ड देण्यात आली आहेत. एकूण चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचं, रुपाला यांनी सांगितलं.
****

 कर्नाटक विधानसभेत कालही सरकारच्या विश्वासमत प्रस्तावावर मतदान होऊ शकलं नाही. आता या प्रस्तावावरची चर्चा सोमवारी पुन्हा सुरू होईल. राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन वेळा दिलेल्या मुदतीत, या प्रस्तावावर मतदान घेता आलेलं नाही.
दरम्यान, कर्नाटकच्या या मुद्यावरून काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी काल लोकसभेत गदारोळ केला. अनेक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून, घोषणाबाजी करत फलक झळकावले.
****

 काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेशात झालेल्या कथित अटकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं काल मुंबईत निदर्शनं करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनांमध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. उत्तरप्रदेशात सोनभद्र इथं, दोन गटात झालेल्या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते, या गावाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.
****

 पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला. सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटून ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला. मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास लोणी काळभोर इथं ही दुर्घटना घडली.
****
 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

राज्य शासनाचे २०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केले. लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना तर पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. औरंगाबाद विभागातून अनंत भालेराव पुरस्कार लातूरच्या डॉ. सीतम सोनवणे आणि औरंगाबादचे जीतेंद्र विसपुते यांना जाहीर झाला आहे. याशिवाय पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार हिंगोलीचे कन्हैय्या खंडेलवाल यांना उत्तेजनार्थ मिळाला असून स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार उस्मानादचे मल्लिकार्जुन सोनवणे यांना जाहीर झाला आहे. येत्या  २७ जुलैला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाईल. यावेळी २०१६ आणि २०१७ साठीचे पत्रकारिता पुरस्कार तसंचमहाराष्ट्र माझा शेतकरी राजालघुचित्रपट स्पर्धा आणिमहाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धांच्या विजेत्यांनाही पुरस्कार वितरीत केले जातील.
****

भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. सचिनसह दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनपूर्वी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेटपटूचाच या या सन्मानासाठी विचार केला जातो.
****

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष तसंच महिला संघानं विजेतेपद पटकावलं आहे. ओडिशात कटक इथं खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत पुरुष संघानं इंग्लड संघाचा ३-२ अशा फरकानं तर  महिला संघानं सिंगापूर संघाचा ३-० अशा फरकानं पराभव करत जेतेपद पटकावलं. भारतीय महिला संघानं या स्पर्धेच विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलं आहे.
****

 इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं काल जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा २१-१४, २१-७ असा पराभव करत, उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सिंधूची लढत चीनच्या चेन यू फई हिच्याशी होणार आहे.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं वेळापत्रक जारी केलं आहे. २५ जुलै रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून पाच ऑगस्ट पर्यत अर्ज मागे घेता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना १९ ऑगस्ट रोजी मतदानाचा हक्क बजावता येईल, २२ ऑगस्ट रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल. या मतदार संघातले विद्यमान आमदार सुभाष झांबड यांचा कार्यकाळ २८ ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे.
****
 बीड शहरात सुरू केलेल्या अमृत अटल पेयजल योजने अंतर्गत कामाचा दर्जा आणि गती राखली जात नसल्याचं समोर आलं आहे. संबंधित ठेकेदारांनी काम गांभिर्याने करावं अन्यथा ठेकेदार कंपनीला काळया यादीत टाकण्याची कारवाई करु, असे निर्देश रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. ते काल बीड इथं, विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. पाणी पुरवठा योजनेबरोबर भुयारी गटारी योजनेच्या कामाबाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...